शेतीपंपांची प्रलंबित १४३२ वीज कनेक्शन मंगळवारपर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:24 IST2021-01-20T04:24:42+5:302021-01-20T04:24:42+5:30
सतेज पाटील यांचे महावितरणला आदेश : ३० मीटर अंतराच्या आतील शेतीपंपांचा समावेश लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : जिल्ह्यातील एप्रिल ...

शेतीपंपांची प्रलंबित १४३२ वीज कनेक्शन मंगळवारपर्यंत
सतेज पाटील यांचे महावितरणला आदेश : ३० मीटर अंतराच्या आतील शेतीपंपांचा समावेश
लोकमत न्यूज नेटवर्क
काेल्हापूर : जिल्ह्यातील एप्रिल २०१८ नंतर पैसे भरून प्रलंबित असलेल्या व लघुदाब वाहिनीपासून ३० मीटरच्या आत अंतर असलेल्या १४३२ शेतीपंपांना मंगळवार (दि. २६)पर्यंत वीज कनेक्शन देण्याचे आदेश पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले. गेली तीन वर्षे पैसे भरून शेतकरी प्रतीक्षेत होते.
शेती पंपाच्या वीज कनेक्शनसाठी शेतकऱ्यांनी चार वर्षांपूर्वी पैसे भरले आहेत. मात्र महावितरणकडे आर्थिक तरतूद नसल्याने वीज कनेक्शन प्रलंबित राहिले आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी अनेक वेळा आंदोलने गेली होती. काही शेतकऱ्यांनी २०१७ मध्ये पैसे भरले आहेत, पैसे भरूनही पिकांना पाणी मिळत नाही. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी पहिल्याच आढावा बैठकीत प्रलंबित वीज कनेक्शन मार्च २०२० पर्यंत जोडले जातील, असे आश्वासन दिले हेते. मात्र कोरोनामुळे सगळी यंत्रणाच ठप्प झाली होती. उन्हाळा तोंडावर आल्याने शेतकरी पुन्हा हवालदिल झाले आहेत. सातत्याने वीजजोडणीसाठी महावितरणकडे शेतकरी चकरा मारू लागले आहेत. याची दखल घेऊन पालकमंत्री सतेज पाटील यांनी मंगळवारपर्यंत ३० मीटर अंतराच्या आतील शेतीपंपाची वीजजोडणी करण्याचे आदेश महावितरणचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांना दिले. त्यानुसार १४३२ वीज कनेक्शन तातडीने दिले जाणार आहेत.
कोट-
जिल्ह्यात एप्रिल २०१८ पासून पैसे भरूनही ५ हजार ९६५ कनेक्शन प्रलंबित आहेत. त्यापैकी पहिल्या टप्यात १४३२ शेतीपंपांना वीजजोडणी केली जाणार आहे. याबाबत महावितरणशी संपर्क साधावा, उर्वरित शेतकऱ्यांना टप्याटप्याने वीज जोडून दिली जाईल.
-सतेज पाटील (पालकमंत्री, कोल्हापूर )
विभागनिहाय प्रलंबित व आता जोडले जाणारे वीज कनेक्शन
विभाग प्रलंबित कनेक्शन ३० मीटर आतील
गडहिंग्लज १३१२ २७०
इचलकरंजी १७२ ५४
जयसिंगपूर ११०१ ३१०
कोल्हापूर ग्रामीण-१ १७४६ ३७८
कोल्हापूर ग्रामीण-२ १६२३ ४१५
कोल्हापूर अर्बन ११ ५
एकूण ५९६५ १४३२