बँकिंग क्षेत्रामधील पेमेंट पद्धती ही अर्थव्यवस्थेतील महत्त्वपूर्ण कणा : अरुंधती सिन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:36 PM2019-11-22T12:36:19+5:302019-11-22T12:39:17+5:30

शिवाजी विद्यापीठाच्या बँक आॅफ इंडिया अध्यासन आणि रिझर्व्ह बॅँक आॅफ इंडिया यांच्यातर्फे ‘ई-पेमेंट व सायबर घोटाळे’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र इमारतीमध्ये करण्यात आले. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर अध्यक्षस्थानी होते.

The payment method in the banking sector is an important element of the economy | बँकिंग क्षेत्रामधील पेमेंट पद्धती ही अर्थव्यवस्थेतील महत्त्वपूर्ण कणा : अरुंधती सिन्हा

बँकिंग क्षेत्रामधील पेमेंट पद्धती ही अर्थव्यवस्थेतील महत्त्वपूर्ण कणा : अरुंधती सिन्हा

Next
ठळक मुद्दे ‘ई-पेमेंट व सायबर घोटाळे’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा

कोल्हापूर : कागदोपत्री व्यवहार कमी होऊन डिजिटल पेमेंट, कार्ड पेमेंट याबरोबरच मोबाईल बॅँकिंगच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेली वाढ ही ग्राहकांच्या मागणीबरोबरच काळाची गरज बनलेली आहे. बॅँकिंग क्षेत्रामधील पेमेंट पद्धती हा अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा कणा आहे. डिजिटल व्यवहारांसाठी लोकपाल सुरक्षा पद्धती चांगल्या प्रकारे कार्यान्वित झालेली आहे. अनेक तरुणांना या क्षेत्रामधील नोकरीच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत, असे प्रतिपादन रिझर्व्ह बॅँक आॅफ इंडिया, विभागीय कार्यालय, मुंबई येथील साहाय्यक महाव्यवस्थापक अरुंधती सिन्हा यांनी गुरुवारी येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या बँक आॅफ इंडिया अध्यासन आणि रिझर्व्ह बॅँक आॅफ इंडिया यांच्यातर्फे ‘ई-पेमेंट व सायबर घोटाळे’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र इमारतीमध्ये करण्यात आले. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर अध्यक्षस्थानी होते.

अरुंधती सिन्हा पुढे म्हणाल्या, सुरक्षित आर्थिक व्यवहारांमध्ये जलदता आणण्यासाठी संपूर्ण बॅँकिंग उद्योगांसह अन्य पेमेंट सिस्टीम आॅपरेटर्सनाही या प्रणालीबाबत सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. रोख आर्थिक व्यवहार कमी करून डिजिटल व्यवहारांकडे जनसामान्यांचा कल वाढविण्याची प्रक्रिया दीर्घकालीन असली तरी त्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. डिजिटल व्यवहारांसाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधांमध्ये बळकटी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. डिजिटल व्यवहारांसाठी आरबीआय एक सुरक्षित प्रणाली तयार करीत आहे.

अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ. विलास नांदवडेकर म्हणाले, सायबर गुन्ह्यांकडे गंभीरतेने व सातत्याने लक्ष देणे आवश्यक आहे. इंटरनेटच्या माध्यमातून जगामध्ये बॅँकिंग व्यवहारामध्ये काही चुकीच्या आणि गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडत आहेत. त्यासाठी बँक, वित्त आणि आॅनलाईन डिजिटल व्यवहारांमध्ये सायबर सुरक्षा अधिक सक्षम करण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

याप्रसंगी आरबीआय मुंबई येथील विभागीय कार्यालयाचे व्यवस्थापक अंकुर सिंग, आदी उपस्थित होते. बँक आॅफ इंडिया कोल्हापूर, लीड बॅँकेचे विभागीय व्यवस्थापक नितीन देशपांडे आणि अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. डी. सी. तळुले यांनीही मनोगत व्यक्त केले. विद्यापीठाच्या बॅँक आॅफ इंडिया चेअर इन रुरल बॅँकिंगचे समन्वयक डॉ. व्ही. बी. ककडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. याप्रसंगी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील, अनिल पाटील यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, प्रशासकीय सेवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

तीन आराखडे
नव्या तंत्र प्रगत बॅँकिंग व्यवस्थेचा ई-पेमेंट हा भाग असून त्याबाबत जनजागृती करण्याचे काम रिझर्व्ह बॅँकेने हाती घेतले आहे. यासाठी तीन वर्षांचा आराखडा तयार केला असून सुरक्षित, खात्रीशीर, परवडणारी ई-देय प्रणाली करीत असताना खर्चघट, स्पर्धावाढ, सोईस्करता व विश्वसनीयता हे चार महत्त्वाचे घटक आहेत, असेही सिन्हा यांनी सांगितले.
 

 

Web Title: The payment method in the banking sector is an important element of the economy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.