Mumbai Hostage Case: पालकांनी सांगितली 'त्या' आजीच्या धैर्याची कहाणी, मुलांना सुरक्षित ठेवले; कोल्हापुरातील साक्षीदाराचा अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 17:13 IST2025-11-03T17:12:29+5:302025-11-03T17:13:55+5:30
जखमी आजींना मिळाला डिस्चार्ज

Mumbai Hostage Case: पालकांनी सांगितली 'त्या' आजीच्या धैर्याची कहाणी, मुलांना सुरक्षित ठेवले; कोल्हापुरातील साक्षीदाराचा अनुभव
कोल्हापूर : त्या दिवशी मात्र मुले जेवणासाठी बाहेरच आली नाहीत. त्यानंतर त्याने १७ मुलांना ओलीस ठेवून त्यांच्या पालकांना व्हिडीओ पाठवला. त्यात काही मुलांसमोर एक केमिकल टाकून लायटर हातात असल्याचे रोहितचे दृश्य होते. यामुळे पालकांमध्ये काही वेळ चलबिचल झाली, मात्र हा शूटिंगचाच भाग असल्याने हा थरार लवकर लक्षात आला नाही, मात्र माझ्या आईने धैर्य दाखवत मुलांना सुरक्षित ठेवले, अशी माहिती ओलिस ठेवलेल्या कोल्हापुरातील दहा वर्षांच्या मुलीच्या आईने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले. या घटनेत जखमी झालेल्या आजींना शनिवारी डिस्चार्ज मिळाला आहे.
पवईतील साकीविहार मार्गावर महावीर क्लासिक या इमारतीत 'बटरफ्लाय' नर्सिंग शाळेच्या आवारात असलेल्या 'आरए' स्टुडिओ भाड्याने घेऊन रोहित आर्या याने गेल्या आठवड्यात तेथे एका ‘ओटीटी’साठी ऑडिशन घेतले. २६ ते २९ या तारखेपर्यंत सकाळी १० वाजता मुले ऑडिशनसाठी जायची. दुपारी मुलांना जेवण्यासाठी सुटी दिली जायची. या चार दिवसांत शूटिंगच्या वेळी कोणालाही रोहितचे वागणे संशयास्पद वाटले नाही.
तो रोजच मुलांना भेटत होता, चॉकलेट देत होता. मुलांशी त्याचे फ्रेंडली नाते तयार झाले होते. लायटरने स्टुडिओ जाळणार असल्याचे सांगणारा पहिला व्हिडीओ समोर आला तेव्हा आम्ही रडू लागलो. याचा इतका जबरदस्त धक्का बसला की, नेमके काय झाले, हे सांगतानाही हातपाय थरथरतात असा अनुभव ओलिस ठेवलेल्या मुलीच्या पालकांनी सांगितला.
आईने दाखवले धैर्य
माझ्या मुलीसोबत माझी ७५ वर्षांची आईही या शूटिंगदरम्यान रोज जात होती. वृद्ध असल्यास दृश्य वास्तववादी होईल असे सांगून त्या दिवशी माझ्या आईलाही त्याने स्टुडिओच्या आत बोलावले. गरम वातावरण असल्याने रिसेप्शनजवळील सीसीटीव्हीबाहेर एसीमध्ये तिला खुर्चीत बसवले. रोहितचा तो व्हिडीओ पालकांमध्ये पसरल्यानंतर आम्ही खाली रडू लागलो, ती गडबड ऐकून आईने फोन केला, तेव्हा तिला खरी परिस्थिती समजली. तिने तत्काळ धैर्य दाखवून जवळ असलेल्या एका खोलीत मुलांना सुखरूप ठेवले.
वृद्ध आईला दिला डिस्चार्ज
जेव्हा पोलिसांनी त्याला मारले, त्यानंतर ती त्याच फोडलेल्या खिडकीतून बाहेर पडली. सर्व मुलांना आधी बाहेर काढले. त्यादरम्यान फुटलेली काच असलेली खिडकी कोसळली, त्यात आई जखमी झाली. तिच्यावर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार झाले. शनिवारी तिला डिस्चार्ज मिळाल्याचे या पालकाने सांगितले.