तीन राज्यात मोस्ट वॉंटेड गुंड पपला गुर्जरला कोल्हापूरात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 19:49 IST2021-01-29T17:49:59+5:302021-01-29T19:49:00+5:30
CrimeNews Police Kolhapur-जयपूर येथील बेहरोडखाना पोलीस ठाण्याचा लाॅकअप तोडून फरार झालेला व पाच लाखांचे बक्षिस असलेला कुख्यात गुंड विक्रम उर्फ पपला गुर्जर यास शुक्रवारी मध्यरात्री जयपूर पोलीसांच्या एका विशेष पथकाने सरनोबतवाडीत अटक केली. ही कारवाई अत्यंत गोपनिय पद्धतीने या पथकाने केली.

तीन राज्यात मोस्ट वॉंटेड गुंड पपला गुर्जरला कोल्हापूरात अटक
कोल्हापूर : जयपूर येथील बेहरोडखाना पोलीस ठाण्याचा लाॅकअप तोडून फरार झालेला व पाच लाखांचे बक्षिस असलेला कुख्यात गुंड विक्रम उर्फ पपला गुर्जर यास शुक्रवारी मध्यरात्री जयपूर पोलीसांच्या एका विशेष पथकाने सरनोबतवाडीत अटक केली. ही कारवाई अत्यंत गोपनिय पद्धतीने या पथकाने केली.
कुख्यात गुंड पपला याच्यावर हरियाणा, राजस्थान,पंजाब ठिकाणांमध्ये त्याने अनेक गुन्हेगारी कृत्य केली होती. त्याची टोळी असून त्याला एका प्रकरणात जयपूर पोलीसांनी त्याला २०१७ मध्ये अटक केली होती. तुरुंगात बसून त्याने अनेक गुन्हेगारी कारवाया सुरुच होत्या.त्यामुळे त्याला ऑक्टोबर २०१९ च्या अखेरीस राजस्थान पोलीसांनी अटक केली होती. त्याची रवानगी बेहरोडखाना पोलीस ठाण्यात केली होती.
कोठडीमध्ये असताना त्याच्या २५ हून अधिक साथीदारांनी पोलीस ठाण्यावरच हल्ला करीत त्याला ७ सप्टेंबर २०१९ ला सोडवून नेले होते. त्यानंतर तो फरार झाला. सध्या त्याचे कोल्हापूरातील सरनोबतवाडी येथे वास्तव्य होते. ही खबर राजस्थान पोलीसांना लागली. त्यांनी गेल्या आठ दिवसांपासून सरनोबतवाडीमध्ये पपला राहत्या ठिकाणाची रेकी केली.
अत्यंत घातकी समजला जाणारा हा गुंड असल्यामुळे राजस्थान पोलीसांनी विशेष प्रशिक्षित पोलीस पथकाला पाचारण केले होते. या पथकाचे नेतृत्व सहायक पोलीस आयुक्त सिद्धांत शर्मा व पोलीस निरीक्षक जहिर अब्बास यांनी केले. गुरुवारी मध्यरात्री राजस्थान पोलीस कारवाई करतानाची पपलाला चाहूल लागली. त्याने दुसऱ्या मजल्यावरून उडी टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यात तो जखमी झाला.
इमारतीखाली दबा धरून बसलेल्या पोलीसांनी त्याला तेथेच जेरबंद केले. त्याच्यासोबत राहणारी जीया शिकलगार नावाची महिलेलाही त्याब्यात घेतले. दोघांना पकडल्यानंतर पोलीस मुख्यालयात आणण्यात आले. तेथून त्यांची रवानगी राजस्थानला झाली.
याकारवाईच्या अखेरच्या क्षणी पपलाकडून दगा फटका होऊ नये, याकरीता राजस्थान पोलीसांनी कोल्हापूर पोलीस दलाची मदत घेतली. शिरोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांच्यासह स्थानिक पथकाने गुरुवारी रात्रीपासून या परिसरात तळ ठोकला होता. पपलाला पकडण्यासाठी राजस्थान पोलीसांनी पकडून देणाऱ्यास पाच लाखांचे बक्षिस जाहीर केले होते. राजस्थान पोलीसांनी कारवाई बाबत अत्यंत गोपनियता पाळत ही कारवाई केली.