Kolhapur: पर्यटकांमुळे पन्हाळगड हाउसफुल्ल; नगरपरिषदेच्या प्रवासी, वाहन कर उत्पन्नात लक्षणीय वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 17:52 IST2025-10-24T17:51:40+5:302025-10-24T17:52:59+5:30
गर्दीमुळे वाहतुकीचा व वाहन पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला

Kolhapur: पर्यटकांमुळे पन्हाळगड हाउसफुल्ल; नगरपरिषदेच्या प्रवासी, वाहन कर उत्पन्नात लक्षणीय वाढ
पन्हाळा : इतिहासाचा साक्षीदार व थंड हवेचे ठिकाण म्हणून पन्हाळगडाची महती सर्वदूर आहे. थंडगार निसर्गरम्य वातावरण, ऐतिहासिक गडकोट व किल्ले तसेच येथील प्रसिद्ध असलेले झुणका भाकर यामुळे पन्हाळगडावर पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. दिवाळीची सुट्टी तसेच शनिवार, रविवार सलग शासकीय सुट्यांमुळे पन्हाळगड पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाला आहे.
कोल्हापूर शहरापासून अवघ्या २० कि.मी. अंतरावर असलेल्या पन्हाळगडावर नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. दिवाळीच्या सुट्टीमुळे येथील तीनदरवाजा, अंधारबाव, सज्जाकोठी, धान्याचे कोठार, पुसाटीबुरुज परिसर, तबक उद्यान, लता मंगेशकर बंगला परिसर, आकाशवाणी टॉवर परिसर, पावनगड, रेडेघाट येथे पर्यटकांचे जथेच्या जथे पहावयास मिळत आहेत. पर्यटकांच्या गदींमुळे लहान-मोठे व्यवसाय तेजीत सुरू आहेत.
वाचा : दाजीपूर जंगल सफारी पर्यटकांसाठी खुली, दिवाळी सुट्ट्यांमुळे पर्यटनस्थळे गजबजली
पर्यटकांच्या गर्दीमुळे पन्हाळा नगरपरिषदेच्या प्रवासी कर व वाहन कर यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. दिवाळी सुट्टीत पाच लाख रुपयांची करवसुली झाल्याचे नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. पन्हाळा गडावर सुमारे दीड लाख पर्यटकांनी विक्रमी हजेरी लावली. पन्हाळ्याचा रणसंग्राम लघुपट पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असल्याचे मुख्याधिकारी चेतन कुमार माळी यांनी सांगितले.
भाजलेले व उकडलेले कणीस, पाणीपुरी, भेळ, रगडा, मिसळ, झुणका-भाकर या खाद्यपदार्थांवर ताव मारताना पर्यटक दिसत आहेत. गर्दीमुळे वाहतुकीचा व वाहन पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला आहे. वाहतुकीच्या कोंडीमुळे नगरपरिषदेच्या इंटरप्रिटिशन हॉलच्या बाजुच्या जागेत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असल्याचे मुख्याधिकारी चेतन कुमार माळी यांनी सांगितले.