पंचगंगा नदी चोरीला : रुकडी ग्रामस्थांचे निवेदन -तक्रार घेण्यास पोलिसांकडून नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 00:54 IST2018-06-12T00:54:03+5:302018-06-12T00:54:03+5:30

पंचगंगा नदी चोरीला : रुकडी ग्रामस्थांचे निवेदन -तक्रार घेण्यास पोलिसांकडून नकार
हातकणंगले : पंचगंगा नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली असून, नदीत जलपर्णीचे साम्राज्य झाले असून, सध्या नदीच गायब झाल्याचे चित्र आहे. यामुळे पंचगंगा नदी चोरीस गेल्याचे उपरोधिक निवेदन मच्छिमार व धनगर समाजाकडून हातकणंगले पोलीस ठाण्यात देण्यात आले. मात्र, पोलीस निरीक्षक एस. एल. डुबल यांनी तक्रार घेण्यास नकार दिला. नदी चोरीला जाणे, ही बाब तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्याचे डुबल यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले.
रुकडी (ता. हातकणंगले) येथील मच्छिमार व धनगर समाजाचे लोक दुपारी एक वाजता हातात टोपले, माश्याची जाळी व मासेमारीचे साहित्य घेऊन हातकणंगले पोलीस ठाण्यात दाखल झाले. दुपारी तीनपर्यंत त्यांच्या निवेदनाची दखल पोलिसांकडून घेतली गेली नाही. अखेर निवेदन देऊन अांदोलनकर्ते निघून गेले. त्यांनी आपल्या निवेदनामध्ये पचगंगेच्या दूषित पाण्यामुळे आजपर्यंत अनेक लोकांना प्राण गमवावे लागेल आहेत.
अनेक कारखान्यांचे दूषित सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळते. तसेच मैलमिश्रित पाणीही कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीत मिसळते. यामुळे संपूर्ण नदीवर जलपर्णी पसरली आहे. त्यामुळे मच्छिमारांचा संपूर्ण व्यवसाय बंद पडला आहे. परिणामी, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याने अखेर आज सनदशीर मार्गाने ‘नदी चोरीला गेली आहे’ अशी फिर्याद देऊन शासनाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करीत आहोत, असे निवेदनात नमूद केले आहे. पंचगंगा नदी प्रदूषित करणाऱ्या कोल्हापूर महापालिका, औद्योगिक वसाहतींसह इतर घटकांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी हातकणंगले पोलिसांत करण्यात आली. ही तक्रार देण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने, जिल्हा परिषद सदस्य बबलू मकानदार, रुकडीचे सरपंच रफीक कलावंत, उपसरपंच शीतल खोत, नंदू शिंगे, महेश चव्हाण, अविनाश बनगे, राकेश खोंद्रे उपस्थित होते.
पंचगंगा नदी प्रदूषण करणाºया घटकांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, या मागणीसाठी साखळी उपोषण, नदीपात्रामध्ये विविध आंदोलने छेडली जात आहेत. रुई बंधारा येथे केंदाळाने नदी व्यापून गेली आहे. केंदाळामध्ये मच्छिमारांनी सोमवारी पंचगंगा नदी शोध आंदोलन केले.