कोल्हापूर : येथील पंचगंगा नदी घाटाला पर्यटनाचा ‘चेहरा’ मिळणार आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने २८ कोटींचा आराखडा तयार केला आहे. प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर निधीसाठी शासनाच्या पर्यटन विकास मंडळाकडे पाठविण्यात येणार आहे. घाटातील ९ एकर जागेत ३५० ते ४५० मीटर लांबीच्या घाटाची पुनर्बांधणी आणि सौंदर्यीकरण केले जाणार आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या कामात विशेष लक्ष घातल्यामुळे लवकरच निधी मिळून कामाला सुरुवात होईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. हिरवागार निसर्ग आणि वाहणारे पाणी मनुष्यासह जीवसृष्टीला मोहित करीत असते. पंचगंगा नदी बारमाही वाहत असते. दरम्यान, सध्या येथील पंचगंगा घाटाची वाईट अवस्था आहे. शुक्रवार पेठेतून येणारे गटारातील सांडपाणी थेट घाटाजवळ नदीत मिसळते. कचरा कोंडाळा जवळच आहे. नदीत कपडे व म्हशी धुतल्या जातात. गणेश विसर्जनानंतर निर्माल्य घाटाच्या काठावर येऊन साचते. विसर्जित केलेल्या मूर्तींचे अवषेश असतात. पावसाळ्यानंतर नदीतील पाणीपातळी खालावल्यानंतर घाटावर दुर्गंधी सुटते. जवळ थांबणेही असह्य होते, असे सध्याचे चित्र आहे. हे चित्र बदलून पर्यटनाचा ‘लुक’ देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने आराखडा तयार केला आहे. नदीकाठी ब्राह्मण, मधला, हनुमान मंदिर असे घाट आहेत. प्रत्येकवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेला दीपोत्सवांनी घाट उजळून निघतो. घाटाची पुनर्बांधणी आणि सौंदर्यीकरणासाठीच्या कामांचे आर्किटेक्ट इंद्रजित नागेशकर यांनी डिझाईन केले आहे. सध्याचे प्रदूषणकारी घटक, ब्रह्मपुरी पिकनिक पॉर्इंट यांचा अभ्यास करून नागेशकर यांनी स्थानिक लोक, मॉर्निंक वॉकर्स, पर्यावरणप्रेमी, पुरातत्वचे अभ्यासक या घटकांशी संवाद साधला. त्यानंतर हे डिझाईन केले आहे. अशाप्रकारे तयार झालेल्या आराखड्याचे सादरीकरण नुकतेच पालकमंत्री पाटील यांच्यासमोर झाले आहे. त्यामुळे आराखडा बांधकाम विभागाकडून जिल्हाधिकरी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. विविध सुविधा : पर्यटनास चालना नवीन आराखड्यात हनुमान मंदिराजवळील घाटापासून म्हशी जाण्याचा रस्ता, परीट घाट, शिवाजी पूल, दशपिंडी घाट, खवन घाटापर्यंत नवीन दगडी बांधकामाचे नियोजन केले आहे. घाटाजवळच नदीने वळण घेतल्यामुळे पाण्याची घुसळण झाल्यामुळे माती वाहून गेल्याने दगड उघडा पडला आहे. यामुळे घाटाचे बांधकाम करणे सोपे होणार आहे. ब्रह्मपुरी पिकनिक पॉर्इंट विकसित करण्यात येणार आहे. पडलेल्या अवस्थेत असलेल्या दीपमाळांची पुनर्बांधणी केली जाईल. घाटावरील सर्व मंदिरांचे जीर्णोद्धार केले जाईल. हनुमान मंदिरापासून शिवाजी पुलापर्यंतच्या घाटांची बांधणी आणि सौंदर्यीकरण करून बागांची निर्मिती केली जाईल. दोन्ही बाजूला दीपमाळा आणि मध्ये उंच वाचनालयासाठी इमारत, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, पर्यटकांना मूलभूत सुविधा, लहान मुलांना खेळण्याची व्यवस्था, ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी ट्रॅक, बसण्यासाठी बैठक करणार आहेत. परराज्यांतील पर्यटकांनाही हेवा वाटावा, असे घाटाचे सौंदर्यीकरण करण्याचे नियोजन आहे.घाटासमोरचा नदीकाठही विकसित करण्याचे नियोजनपंचगंगा घाटाच्या समोरच्या नदीकाठालगत खासगी शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. त्या जमिनीवर कोणत्याही प्रकारे बांधकाम न करता संबंधित शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन नदीघाटही विकसित करण्याचे पुढच्या टप्प्यात नियोजन आहे. घाटावरून बोटीने समोरच्या नदीकाठावर पर्यटक गेल्यानंतर शेतकऱ्यांनी पार्क तयार केल्यास पर्यटक विसावतील. त्यातून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळेल, असे नियोजन आहे.
पंचगंगा घाटाचा आता नवा ‘थाट’
By admin | Updated: November 18, 2015 00:01 IST