कोल्हापूर : कोरोनामुळे मृत्यूंची संख्या एकदम वाढल्यामुळे कोरोनाग्रस्तांसाठी राखीव ठेवलेली पंचगंगा स्मशानभूमीही पेटणाऱ्या चिता पाहून शनिवारी सुन्न झाली. एकाचवेळी दहापेक्षा जास्त मृतदेह अंत्यसंस्कारासाठी येत असल्याने तेथील कर्मचाऱ्यांची तारांबळ उडत आहे. त्यातच पावसाळी वातावरण असल्याने लाकडे आणि शेणी सांभाळून ठेवण्यासाठीही आटापिटा करावा लागत आहे.
कोरोनाग्रस्त असलेल्या मृत्यूंची संख्या वाढली असल्याने पंचगंगा स्मशानभूमीतील सर्व बेड राखून ठेवण्यात आले आहेत. तेथे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने नियुक्त केलेल्या २० कर्मचाऱ्यांमार्फत पीपीई कीट घालून सर्व खबरदारी घेऊन अंत्यसंस्काराचे काम अविरत सुरू आहे. कोल्हापुरात गेल्या चार-पाच दिवसांपासून मृत्यूची संख्या एकदम वाढली आहे. दोन दिवसांत बळींची संख्या सव्वाशेच्या घरात गेली आहे. यात आयजीएम वगळता सीपीआरसह खासगी दवाखान्यामध्ये मृत झालेल्या कोरोनाग्रस्तांचा दहनविधी बऱ्याचवेळा पंचगंगा स्मशानभूमीतच होतो. अपवादात्मक स्थितीतच मृतदेह नातेवाइकांकडे सोपविले जात आहेत.
त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून वाढलेल्या मृतांच्या आकड्याचा प्रचंड ताण स्मशानभूमीवर आहे. बेड रिकामे होतील तसे वेगाने अंत्यसंस्कार केले जात आहेत. गॅस दाहिनीचीही मदत घेतली आहे. शेणी व लाकडांचे सरण रचण्यापासून ते अग्नी देऊन रक्षा गोळा करण्यापर्यंतचे सर्व काम महापालिकेचे कर्मचारी करीत आहेत. नातेवाइकांना लांबच ठेवले जाते.
शनिवारी तर एकदम १३ मृतदेह दहनासाठी आल्यानंतर कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. एकाचे सरण रचण्याचे, तर दुसऱ्याला अग्नी देण्याचे काम वेगाने होत होते. हे सर्व वातावरण पाहून स्मशानभूमीसह कर्मचारीही सुन्न झाले असून, त्यांच्याकडे बोलण्यासाठीचे शब्द उरलेले नाहीत. नि:शब्दपणे आपले कर्तव्य पार पाडत आहेत.
फोटो: ०८०९२०२१-कोल-पंचगंगा स्मशान ०१, ०२
फोटो ओळ : कोरोनाग्रस्त मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी राखीव ठेवलेल्या पंचगंगा स्मशानभूमीत शनिवारी एकदम १३ मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आल्याने महापालिका कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. (छाया : आदित्य वेल्हाळ)