कर्नाटक विधानसभा मतदानासाठी सीमेलगतच्या कामगारांना पगारी सुट्टी; उद्योग, कामगार विभागाचा निर्णय
By भीमगोंड देसाई | Updated: May 4, 2023 14:38 IST2023-05-04T14:36:57+5:302023-05-04T14:38:51+5:30
कोल्हापूर, सांगली, सोलापूरसह सात जिल्हयासाठी निर्णय लागू

कर्नाटक विधानसभा मतदानासाठी सीमेलगतच्या कामगारांना पगारी सुट्टी; उद्योग, कामगार विभागाचा निर्णय
कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार विभागाने कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी बुधवारी कोल्हापूर, सांगली, सोलापूरसह सात जिल्हयातील सीमेलगतचे कारखाने, हॉटेल व इतर खासगी आस्थापनातील कामगारांना पगारी सुट्टी जाहीर केली आहे. यामुळे कर्नाटकातील मतदार कामगार महाराष्ट्रात काम करीत असल्यास त्यांना गावी जावून मतदान करता येणार आहे.
कर्नाटकातील अनेक मतदार सीमेलगतच्या जिल्हयात खासगी कंपन्या, संस्थामध्ये काम करतात. त्यांना विधानसभा मतदानासाठी जाता यावे, यासाठी सुट्टी जाहीर केली आहे. हा आदेश कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सिंधुदूर्ग, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यातील कामगारांना लागू होणार आहे. या आदेशानुसार शासनाच्या कामगार विभागाच्या अखत्यारित येणारी सर्व दुकाने, कारखाने, कंपन्या, निवासी हॉटेल, खाद्यगृह, नाट्यगृह, व्यापारी, तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्समधील कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी देणे बंधनकारक आहे.
अपवादात्मक परिस्थितीमध्ये सुट्टी देणे शक्य नसल्याने मतदानासाठी आवश्यक दोन ते तीन तास वेळे देण्याची सूचना आहेत. कर्नाटकातील मतदार कामगारास मतदानादिवशी सुट्टी न दिल्याची तक्रार आल्यास संंबंधीत अस्थापनाविरोधात कारवाई करण्याचा इशारा शासनाचे उपसचिव दादासाहेब खताळ यांनी दिला आहे.