पगाराविना दिवाळीत ‘शिमगा’
By Admin | Updated: October 22, 2014 00:23 IST2014-10-22T00:20:03+5:302014-10-22T00:23:19+5:30
तीन महिन्यांपासून परवड : मतिमंद, मूकबधिर शिक्षण संस्थांतील शिक्षकांसह २८८ जणांची अवस्था

पगाराविना दिवाळीत ‘शिमगा’
भीमगोंडा देसाई - कोल्हापूर जिल्ह्यातील अंध, मूकबधिर, मतिमंद अशा अनुदानित शिक्षण संस्थांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह २८८ जणांची गेल्या तीन महिन्यांपासून पगारासाठी परवड सुरू आहे. कर्ज काढून संबंधित शिक्षकांना घर चालवावे लागत आहे. दिवाळी तोंडावर आल्यामुळे आता तरी थकीत पगार मिळणार का? असा सवाल शिक्षक उपस्थित करीत आहेत.
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण प्रशासनाला उशिरा जाग येऊन आता पगार देण्यासाठी हालचाल सुरू केली आहे. दिवाळीच्याआधी पगार मिळाला तर संबंधित शिक्षकांची दिवाळी साजरी होणार आहे; अन्यथा पगारासाठी प्रशासनाच्या विरोधात त्यांना ‘शिमगा’ करावा लागणार आहे.
काही मुले जन्मजातच विविध कारणांमुळे अंध, मूकबधिर, मतिमंद असतात. अशी मुले सर्वसाधारण मुलांच्या शाळांमध्ये शिक्षणाचे धडे घेत असताना त्यांना अनेक अडचणी येतात. अनेकवेळा सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या शाळेत असे विद्यार्थी शिक्षण घेऊ शकत नाहीत. परिणामी, शिक्षणापासून त्यांना वंचित राहावे लागते. अशा मुलांना सांभाळतानाही आई-वडिलांची दमछाक होत असते. शिक्षणापासून दूर राहिल्यास संबंधित मुलांचे भविष्यच अंधकारमय बनते. त्यामुळे जिल्ह्यात अंध, मूकबधिर, मतिमंद अशा मुलांसाठी स्वतंत्र शिक्षण संस्था निघाल्या. जिल्ह्यातील मूकबधिर ७, मतिमंद ७, अंध १, अशा १५ संस्थांना १९९६ साली शासनाकडून अनुदान मिळाले. त्यानंतर अशा संस्थांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना शासनाकडून पगार मिळू लागला. वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या संबंधित प्रत्येक विद्यार्थ्याला राहणे, जेवण, गणवेश यासाठी प्रत्येक महिना ९०० ते ९३० रुपये दिले जातात. हे पैसे, वेतन, वेतनेतर अनुदान देण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे सोपवली आहे. परंतु, नेहमी तांत्रिक कारणे पुढे करीत समाजकल्याण प्रशासनाने पगार, अनुदान नियमित देण्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. महिना संपल्यानंतर पगार झाला नाही, तर संबंधित संस्थांचे प्राचार्य, अध्यक्ष समाजकल्याण विभागात चकरा मारीत विचारणा करतात, पाठपुरावा करतात. मात्र, तांत्रिक कारणे सांगून वेळ मारून नेली जाते.
अंध, मूकबधिर, मतिमंद मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी त्यांना शिक्षणाचे धडे देणाऱ्या शिक्षकांची परवड झाली आहे. शासकीय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे या शिक्षकांना वेळेवर पगार मिळत नसल्याने ऐन दिवाळीत त्यांच्या घरात अंधार असल्याची खंत व्यक्त होत आहे.
आॅगस्टपासून शिक्षकांचे पगार झालेले नाहीत. प्रत्येक महिन्याला पगारासाठी पाठपुरावा करतो. कधीही वेळेवर पगार होत नाही. यामुळे शिक्षकांना कर्ज काढून घर चालवण्याची वेळ अनेकवेळा येते. दिवाळीपूर्वी थकीत असलेला सर्व पगार न मिळाल्यास आर्थिक समस्येला सामोरे जावे लागणार आहे. अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणे वेळेवर पगार झाला पाहिले.
- प्राचार्य एस. एस. कांबळे,
चैतन्य मतिमंद शाळा, गडहिंग्लज
गेल्या दोन दिवसांपासून पगार जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नेमका किती महिन्यांचा पगार जमा केला, हे मोबाईलवरून सांगता येणार नाही. मात्र, पगार जमा केले जात आहेत.
- एस. के. वसावे, समाजकल्याण अधिकारी