कोल्हापूर : जिल्ह्यासाठी सोमवारी सायंकाळी पाचपर्यंत पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला होता. मात्र, दिवसभर उघडीप राहिली. धरणक्षेत्रातपाऊस कमी असल्याने विसर्ग कमी आहे. परिणामी नद्यांची पातळी कमी होऊ लागली आहे. सोमवारी दुपारी चार वाजता पंचगंगा नदीची पातळी १७.९ फुटांपर्यंत होती. बारा बंधारे पाण्याखाली असून राधानगरी धरण ९२ टक्के तर दूधगंगा ७५ टक्के भरले आहे.गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरणात बदल झाला असून पावसाच्या सरी कोसळत आहेत. सोमवारपासून पावसाचा जोर वाढेल असा अंदाज होता. त्यात हवामान विभागाने सायंकाळी पाचपर्यंत ऑरेंज अलर्ट दिला होता. पण, प्रत्यक्षात ऊन राहिले.
सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ४.९ मिलीमीटर पाऊस झाला. सर्वाधिक ३५.४ मिलीमीटर पाऊस गगनबावडा तालुक्यात झाला. त्या पाठोपाठ शाहूवाडी तालुक्यात १०.५ मिलीमीटर झाला.आठ धरणे तुडुंब..सोमवारी जिल्ह्यातील जांबरे (ता. चंदगड) हे ०.८२ टीएमसी तर कडवी (ता. शाहूवाडी) येथील २.५२ टीएमसी क्षमतेचे धरण भरले. यापूर्वी सहा अशी आतापर्यंत आठ धरणे तुडुंब झाली आहेत.