Kolhapur: कर्णकर्कश आवाजावेळी चिडीचूप.. अंबाबाईच्या मंजूळ स्तोत्राचा मात्र त्रास

By भारत चव्हाण | Updated: July 22, 2025 12:06 IST2025-07-22T12:06:20+5:302025-07-22T12:06:38+5:30

ध्वनियंत्रणेला विरोध : पावणेतीन कोटी खर्चून १२० खांब उभारले

Opposition to the Manjul Stotra in the sound heritage pillars erected at a cost of crores of rupees in the Ambabai Temple area of Kolhapur | Kolhapur: कर्णकर्कश आवाजावेळी चिडीचूप.. अंबाबाईच्या मंजूळ स्तोत्राचा मात्र त्रास

Kolhapur: कर्णकर्कश आवाजावेळी चिडीचूप.. अंबाबाईच्या मंजूळ स्तोत्राचा मात्र त्रास

भारत चव्हाण

कोल्हापूर : एकीकडे मोठ्या साउंड सिस्टममुळे कानठळ्या बसविणारा आवाज सोडला जात असताना मिरवणुकीतील संयोजकांविरुद्ध तक्रारीचा ‘ब्र’सुद्धा न काढणाऱ्या शहरवासीयांना अंबाबाई मंदिर परिसरात सकाळी आणि संध्याकाळी उमटणाऱ्या मंजूळ स्वरांचा त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या ध्वनियुक्त हेरिटेज खांबांची अवस्था ‘असून अडचण आणि नसून खोळंबा’ अशी झाली आहे.

करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी प्रत्येकवर्षी लाखो भाविक येत असतात, या भाविकांचे मंदिराच्या परिसरात आगमन होताच मन प्रसन्न व्हावे, त्यांच्या कानावर देवीच्या स्तोत्राचे मंजूळ स्वर पडावेत. त्यांना आध्यात्मिक समाधान लाभावे, म्हणून मंदिर परिसरात ध्वनियंत्रणा उभारली आहे. ध्वनियुक्त खांबांसाठी २ कोटी ६५ लाखांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मंदिर परिसरातील दोनशे ते तीनशे मीटर परिसरात देवीचे स्तोत्र, आरती, भक्तिगीते भाविकांना ऐकायला मिळतील, अशा पद्धतीने १२० खांब उभे केले आहेत;

परंतु हेच खांब मंदिर परिसरातील व्यापारी, विक्रेते, तसेच काही नागरिकांना त्रासदायक ठरत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. लग्नाची वरात असो, शिवजयंतीची मिरवणूक असो, की गणेशोत्सवातील मिरवणुका असोत, त्यात वाजणाऱ्या मोठ्या आवाजाच्या साउंड सिस्टमचा कोणाला त्रास होत नाही आणि झाला तरी कोणी तक्रार करीत नाही. सर्व जण ते मुकाट्याने सहन करतात; परंतु मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या ध्वनियुक्त खांबाचा त्रास होऊ लागल्याने देवस्थान समितीकडे अनेक तक्रारी येत असल्याचे समिती कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.

महाद्वार रोडवरील व्यापारी, मंदिर परिसरातील विक्रेते यांच्याकडून या ध्वनियुक्त खांबावर लावल्या जाणाऱ्या भक्तिगीतांच्या आवाजाबाबत तक्रारी होत आहेत. रोज होणाऱ्या तक्रारीमुळे मध्यंतरी काही दिवस ही यंत्रणा बंद ठेवली होती. त्यानंतर ती पुन्हा सुरू करण्यात आली; परंतु आवाज एकदम कमी करण्यात आला आहे. देवीचे स्तोत्र आणि गणपतीची गाणी लावण्याने त्रास होत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मंदिर परिसरात आवाज मंजूळ असावा. तो कर्णकर्कश असू नये, अशी आमची अपेक्षा आहे. व्यापारी, विक्रेत्यांना त्रास होत असल्याने त्यांच्या वतीने मी देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्याकडे तक्रार केली आहे. आवाज मंजूळ असावा, सकाळी ०६:०० ते ११:०० व सायंकाळी ०६:०० ते ०९:००, अशा विशिष्ट वेळेत स्तोत्र लावले जावे. शाळेच्या आणि कामाच्या वेळेत ध्वनियंत्रणा बंद ठेवावी. - श्याम जोशी, महाद्वार रोड व्यापारी
 

मंदिर परिसरातील ध्वनियंत्रणेचा त्रास होत असल्याच्या रोज तक्रारी येत आहेत. ध्वनियंत्रणा बंद करा इथपासून खांब काढून टाका, अशाही सूचना फोनवर केल्या जात आहेत. आम्ही मर्यादित आवाजात ही ध्वनियंत्रणा सुरू ठेवली असून, त्यावर देवीचे स्त्रोत्र, तसेच काही गाणी लावतो. - अभिजीत पाटील, यंत्रणा हाताळणारे मंदिर कर्मचारी

Web Title: Opposition to the Manjul Stotra in the sound heritage pillars erected at a cost of crores of rupees in the Ambabai Temple area of Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.