कोल्हापूर : राजस्थानातून आणलेल्या अफूची कोल्हापुरात विक्री करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मंगळवारी (दि. २०) अंबप फाटा येथे छापा टाकून अटक केली. रवींद्र गोधनराम बेनिवाल (वय २०, सध्या रा. अंबप फाटा, ता. हातकणंगले, मूळ रा. उदवनगर, पडियार, जि. जोधपूर, राजस्थान) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून १ लाख २० हजार रुपयांचा १२ किलो अफू व इतर साहित्य जप्त केले.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात सध्या अमली पदार्थ विक्री विरोधी विशेष शोधमोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत अंमलदार प्रवीण पाटील यांना अंबप फाटा येथे एक परप्रांतीय तरुण अफूची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने मंगळवारी छापा टाकून कारवाई केली. रवींद्र बेनिवाल याच्या खोलीत १२ किलो अफू सापडला. पोलिसांनी अफू आणि त्याचा मोबाइल जप्त केला. जप्त केलेला अफू राजस्थानातून ट्रकचालकांमार्फत आणल्याची कबुली त्याने दिली. अफूच्या बोंडांची भुकटी करून विक्री केल्याचे त्याने चौकशीत पोलिसांना सांगितले. त्याच्यावर पेठ वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपासासाठी त्याचा ताबा पेठवडगाव पोलिसांकडे देण्यात आला.पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्यासह अंमलदार प्रवीण पाटील, अरविंद पाटील, अशोक पोवार, कृष्णात पिंगळे, सुरेश पाटील, सोमराज पाटील, अनिल जाधव, आदींच्या पथकाने कारवाई केली.
राजस्थानचा दुसरा आरोपी अटकेतस्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गेल्यावर्षी महामार्गावर वाठार परिसरातून अफू विकणाऱ्या एका राजस्थानी आरोपीस अटक केली होती. त्यानंतर वर्षभरात अफू विक्रीच्या गुन्ह्यात दुसरा राजस्थानी तरुण पोलिसांच्या हाती लागला. यावरून राजस्थानमधून येणाऱ्या अमली पदार्थांची कोल्हापुरात विक्री होत असल्याचे स्पष्ट होत असल्याचे पोलिसांनी सांगितले.ट्रकचालकांना विक्रीअटकेतील आरोपी बेनिवाल हा ट्रकचालकांना अफूची विक्री करत होता. पुणे-बंगळुरू महामार्गावर किणी टोल नाका ते कोल्हापूरपर्यंत ठिकठिकाणी थांबून तो अफूची विक्री करत होता. त्याला अफूचा पुरवठा करणाऱ्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.