निर्यातबंदीविरोधात मंगळवारी कांदा मार्केट बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 15:12 IST2019-10-12T15:11:37+5:302019-10-12T15:12:29+5:30
केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी करून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले असून, या निर्णयाचा निषेध करण्यासाठी मंगळवारी (दि. १५) कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील कांदा मार्केट बंद ठेवणार आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे अजित नरंदे व संजय कोले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

निर्यातबंदीविरोधात मंगळवारी कांदा मार्केट बंद
कोल्हापूर : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी करून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले असून, या निर्णयाचा निषेध करण्यासाठी मंगळवारी (दि. १५) कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील कांदा मार्केट बंद ठेवणार आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे अजित नरंदे व संजय कोले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मागील तीन वर्षे कांद्याचे अधिक अधिक उत्पादनामुळे दर पडले. यंदा सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्यात कांद्याचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना चार पैसे मिळण्याची संधी प्राप्त झाली होती. तथापि सरकारने कांद्याची निर्यात रोखण्याचा निर्णय घेतला.
केवळ निर्यातबंदी करून सरकार थांबले नाही तर देशांतर्गत कांदा व्यापारावर साठा मर्यादा घातली. घाऊक व्यापाऱ्यांना केवळ ५० टन, तर किरकोळ व्यापाऱ्यांना १० टन साठा मर्यादा घातली आहे. बांगलादेशात चाललेल्या कांद्याचे ट्रक सात दिवस रोखून धरले.
या निर्णयाने शेतकरी व व्यापारी उद्ध्वस्त होणार आहेत. अगोदरच गेली तीन-चार वर्षे कमी दरामुळे कांदा उत्पादक अडचणीत आला आहे. कांद्याचे दर थोडे वाढले की लगेच ओरड सुरू होते आणि सरकारही तातडीने दर कमी करण्यासाठी हवे ते निर्णय घेते.
सरकारबरोबरच विरोधी पक्षांनी कांद्याचा मुद्दा राजकारणासाठी वापरला जाऊ नये, असे नरंदे व कोले यांनी सांगितले. मंगळवारच्या मार्केट बंदमध्ये सगळे व्यापारी आणि शेतकरी सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी मुसा देसाई, आदम मुजावर, आदी उपस्थित होते.