वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये रूपांतराला वर्षाची मुदतवाढ, कोल्हापूर जिल्ह्यातील किती प्रकरणे प्रलंबित.. जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 11:34 IST2025-02-05T11:33:04+5:302025-02-05T11:34:43+5:30
३१ डिसेंबरपर्यंत अभय योजना लागू राहणार

वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये रूपांतराला वर्षाची मुदतवाढ, कोल्हापूर जिल्ह्यातील किती प्रकरणे प्रलंबित.. जाणून घ्या
कोल्हापूर : शासकीय भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये रूपांतरित करण्यासाठी सवलतीच्या दराने अधिमूल्य आकारण्याच्या अभय योजनेला राज्य शासनाने वर्षाची मुदतवाढ दिली आहे. याचा जिल्ह्यातील ३००च्या वर खातेदारांना फायदा होणार आहे. यापूर्वी प्रलंबित असलेल्या प्रकरणांना तसेच ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत दाखल होणाऱ्या अर्जांसाठी ही योजना लागू राहणार आहे.
कृषिक, निवासी, वाणिज्यिक किंवा औद्योगिक प्रयोजनासाठी दिलेल्या शासकीय जमिनींचे किंवा भाडेपट्ट्याने दिलेल्या वर्ग-२ जमिनींचे वर्ग-१ मध्ये रूपांतरण करण्यासाठी सवलतीच्या दराने अधिमूल्य भरण्यासाठीची मुदत संपली आहे. मात्र, राज्यात अशी रूपांतरणाची खूप प्रकरणे प्रलंबित असल्याने या योजनेस मुदतवाढ देण्याबाबत वारंवार मागणी होत होती. त्यामुळे या सवलतीच्या दराने अधिमूल्य भरण्याच्या योजनेस आणखी एक वर्षाची मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात आली. याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
शासनाने यापूर्वी मार्चअखेरपर्यंत अर्ज आलेल्यांसाठी जमीन वर्ग १ करण्यासाठी नोव्हेंबरअखेरपर्यंत रक्कम भरण्यास मान्यता दिली होती. त्यानुसार जेवढ्या नागरिकांनी योग्य कागदपत्रांनिशी अर्ज दिला त्या सर्वांना योजनेचा लाभ मिळाला. पण, याची नेमकी संख्या जिल्हा प्रशासनातील संबंधित विभागाकडे नाही.
८६ प्रकरणे शासनस्तरावर प्रलंबित
जिल्ह्यातील ज्या नागरिकांनी मार्चअखेरपर्यंत जमीन वर्ग एक करण्यासाठीचे अर्ज दिले आहेत, त्यांचे अर्ज नोव्हेंबरपर्यंत निर्गत करण्यात आले आहेत. ८६ प्रकरणे शासनस्तरावर प्रलंबित आहेत. मुदतीत रक्कम भरण्याविषयी ज्यांना कळविण्यात आले होते, तरीही त्यांनी भरलेले नाहीत अशा लोकांना त्यांनी रक्कम न भरल्याने लाभ देता येणार नाही, असे कळविले आहे.