सरकारी काम, वर्षभर थांब; कोरोना संपल्यावर मिळाली कलाकारांना मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 14:03 IST2022-07-28T14:02:43+5:302022-07-28T14:03:02+5:30
जिल्ह्यातील २८० कलाकारांच्या खात्यावर सोमवारी पाच हजार रुपयांची मदत जमा केली आहे.

सरकारी काम, वर्षभर थांब; कोरोना संपल्यावर मिळाली कलाकारांना मदत
कोल्हापूर : सरकारी काम, सहा महिने नव्हे तर वर्षभर थांब, असा अनुभव कलाकारांना आला आहे. कोरोनाच्या दोन वर्षांत कलांचे सादरीकरण बंद असल्याने हालअपेष्टा सहन कराव्या लागलेल्या २८० कलाकारांची शासनाला आता दया आली आहे. संसर्ग संपून वर्ष झाल्यावर जिल्ह्यातील २८० कलाकारांच्या खात्यावर सोमवारी पाच हजार रुपयांची मदत जमा केली आहे.
कोरोना संसर्गाने दोन वर्षे सर्वांना वेठीला धरले होते. नोकरदारांचे एकवेळ ठीक, पण कलाकार आणि हातावरचे पोट असलेल्या कष्टकऱ्यांचे आई जेवू घालेना आणि बाप भीक मागू देईना अशी अवस्था झाली. सांस्कृतिक कार्यक्रम, सादरीकरणाला मोठ्या संख्येने लोक एकत्र येतात म्हणून लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरही सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्यगृहे, चित्रपटगृहांवर बंदी होती. या काळात कुटुंब सावरण्यासाठी शासनाने अनुदान द्यावे यासाठी कलाकार संघटनांनी प्रयत्न केले होते.
त्या मागणीला कोरोना संपल्यानंतर जवळपास एक वर्षाने न्याय मिळाला आहे. आलेल्या अर्जातून जिल्हास्तरीय एकल कलाकार निवड समितीने २८० कलाकारांना पात्र ठरवून त्यांची यादी सांस्कृतिक कार्य विभागाला ३१ मार्च रोजी पाठवली होती. अखेर सोमवारी सांस्कृतिक खात्याने या कलाकारांच्या खात्यावर प्रत्येकी रुपये पाच हजार जमा केले आहेत. निवड झालेल्या ज्या कलाकारांच्या खात्यावर अजूनही रक्कम जमा झाली नाही त्यांनी तातडीने जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.