बिद्रेवाडी येथे एकाचा खून; वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी बॅटरी फेकली पण जीव गेला दुसऱ्याचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2024 20:18 IST2024-11-19T20:18:16+5:302024-11-19T20:18:52+5:30
बिद्रेवाडी गावच्या हद्दीत घडली ही घटना घडली.

बिद्रेवाडी येथे एकाचा खून; वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी बॅटरी फेकली पण जीव गेला दुसऱ्याचा
नेसरी: बिद्रेवाडी (ता. गडहिंग्लज)येथे जमिनावर सुटून आलेल्या आपल्या वडिलांच्या खुनाच्या आरोपीला मोटारसायकलची बॅटरी फेकून मारत असताना नेम चुकल्याने त्याच्यासोबत असलेल्या अजित उर्फ गोपाळ मारुती गुरव (वय ४५) याला आपला जीव गमवावा लागला. ही घटना मंगळवारी (दि.१९) दुपारी साडेतीनच्या सुमारास बिद्रेवाडी गावच्या हद्दीत घडली ही घटना घडली.
ऐन निवडणुकीत घडलेल्या अकास्मिक घटनेने गडहिंग्लज तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिसांनी संशयित आरोपी आकाश उत्तम नाईक (30) व लखन परशराम नाईक (28) रा. वाटंगी यांना दोन तासाच्या आत अटक केली आहे.
अधिक माहिती अशी, बिद्रेवाडी येथील उत्तम भरमू नाईक (वय ५०) याचा 'माझ्या बायकोकडे सारखे का बघतोस', असे म्हणून गल्लीतीलच सचिन भीमराव नाईक (वय ३६) याने जानेवारी महिन्यात लाकडी ओंडका मारुन ठार मारले होते. हा राग वडील भीमराव नाईक यांचा मुलगाआकाश याने धरला होता. आज दुपारी सचिन नाईक व मयत अजित गुरव हे नेसरीकडे येत होते तर आकाश नाईक व लखन नाईक हे नेसरीकडून मोटारसायकल बॅटरी दुरुस्त करून बिद्रेवाडी गावी येत असताना गावच्या वेशीवर समोरासमोर आले. यावेळी सचिन हा आकाशकडे बघून हसला त्याचवेळी आकाशने बॅटरी सचिनच्या दिशेने जोरात फेकली मात्र, त्याचा नेम चुकला अन् त्याच्यासोबत असलेल्या अजित गुरव याच्या डोक्याला बसली.अती रक्तस्त्राव होऊन अजितला जीव गमावावा लागला. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली अन आरोपी दोन तासात जेरबंद झाले. अधिक तपास सपोनि कमालसिंग रजपूत करीत आहेत.