बरगेवाडी येथे झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2023 20:31 IST2023-12-15T20:31:16+5:302023-12-15T20:31:39+5:30
मयत व्यक्तीच्या शरीराचे दोन तुकडे ,तर एक जखमी.

बरगेवाडी येथे झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू
राजेंद्र पाटील, भोगावती : बरगेवाडी (ता.राधानगरी) येथे झाड अंगावर पडून एकाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.दौलत मसू लोहार (वय ६८ रा.कौलव, ता.राधानगरी) यांचा जागीच मृत्यू झाला आहे.तर श्रीपती गणू पाटील -बेलेकर (रा.बरगेवाडी) यांचा एक पाय निकामी झाला आहे.दौलत लोहार यांच्या अंगावर झाड पडल्यानंतर त्यांच्या शरीराचे दोन भाग झाले होते.एवढे भयानक घटनास्थळावरील चित्र होते या अपघाताची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात झालेली आहे.
शुक्रवारी दुपारी तीनच्या आसपास लोहार हे आपल्या सोबत काही जणांना घेऊन झाड तोडून आणण्यासाठी गेलेले होते.दौलत लोहार हे व्यवसायाने सुतार काम करत असत घराला लागणारे बडोदे,दरवाजे ते तयार करून देत असत.या कामासाठी म्हणून त्यांनी बरगेवाडी येथील शहाजी रामचंद्र बरगे यांच्या मालकीची तीन झाडे विकत घेतलेली होती.ती तोडुन झाल्यानंतर त्याझाडाला दोरी बांधून वडून खाली पाडले जात होते.त्यामध्ये स्वतः दौलत लोहार हे ओढत असताना पडणाऱ्या झाडाच्या गतीनुसार त्यांना पळता न आल्याने झाड थेट लोहार यांच्या अंगावर आले.त्यात लोहार यांचा जागीच मृत्यू झाला.त्यांचा मृत्यू एवढा भयानक झाला आहे की त्यामध्ये त्यांचे डोके छिन्नविच्छिन्न होऊन डोक्यापासून खालील शरीराची दोन भाग झालेले होते,तर श्रीपती पाटील हे देखील कसेबसे पळत जात असताना पडल्याने त्यांचा एक पाय निकामी झाला आहे.
लोहार यांची घरची परिस्थिती अतिशय बेताची असून त्यांच्या पश्चात मुलगा,पत्नी,सून,नातवंडे असा परिवार आहे.या अपघाताची नोंद राधानगरी पोलिस ठाण्यात झालेली असून पोलिसांच्या कडून अधिक तपास केला जात आहे.