कोल्हापूर : जिल्हा परिषदेची तीन बनावट धनादेशांच्या माध्यमातून ५७ कोटींची फसवणूक प्रकरणातील शाहूपुरी पोलिसांच्या पथकाने उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथून एका परप्रांतीयाला अटक केली. कपिल चौधरी (वय २८, रा. एच. २१४, गोविंदपुरम गल्ली नंबर ५, गाझियाबाद, उत्तर प्रदेश) असे त्याचे नाव आहे. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता २५ मार्चपर्यत पोलिस कोठडी सुनावली. अद्याप या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि रंँकेटचा शोध पोलिस घेत आहेत.जिल्हा परिषदेच्या नावाचे तीन बनावट धनादेश तयार करून शिक्के मारून, बनावट स्वाक्षरी करून ५७ कोटी ४ लाख ४० हजार ७८६ रुपयांचे धनादेश संशयितांनी तयार केले होते. २१ फेब्रुवारी, २०२५ ला केडीसीसीच्या जिल्हा परिषद शाखेच्या बँक खात्यावरून जिल्हा परिषद वित्त विभागाच्या नावे हा प्रकार घडला होता. बोगस धनादेशाच्या माध्यमातून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वित्त व लेखा अधिकारी कृष्णात लक्ष्मण पाटील यांनी शाहूपुरीत फिर्याद दाखल केली होती. तर उर्वरित दोन्ही धनादेश वटण्याची प्रक्रिया थांबविण्याची विनंती संबधित बँकेला केली होती. त्यानुसार दोन्ही बनावट धनादेश बँकेने अदा केलेले नव्हते.या पैकी १८ कोटी ४ लाख ३० हजार ६४१ रुपयांचा धनादेश चौधरी याने फोकस इंटरनॅशनल कंपनी स्थापन केली होती. त्याने स्वत:च्या कंपनीच्या नावे मुंबई येथील आयडीएफसी बँकेच्या खात्यावर धनादेश भरला होता. तर उर्वरित दोन धनादेश त्रिनीती इंटरनॅॅशनल आणि अन्य एका कंपनीच्या नावे भरला होता. चौधरी याने चार महिन्यांपूर्वी ही तीन खाती उघडली होती. त्याला या सर्व व्यवहाराची माहिती होती.या प्रकरणी शाहूपुरी पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाकडून शोधमोहीम सुरू होती. संशयितांच्या शोधासाठी २५ लोकेशन तपासले. मात्र त्याचा ठावठिकाणा लागलेला नव्हता. या प्रकरणात पोलिसांना मुंबई येथील आयडीएफसी बँकेतील खात्यातील चौधरी याचे खाते क्रमांक सापडले. त्यावरून मोबाइल क्रमांक मिळविला. अनेकदा त्याने या बँकेतून व्यवहार केल्याचे उघड झाले. बँकेतील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासल्यानंतर संशय अधिक बळावला. त्याने बँकेत दिलेल्या पत्त्यावरून पोलिस गाझियाबादला रवाना झाले.
सीसीटीव्हीत दिसला आणि सापडलापोलिस संशयितांचा शोध घेत गाझियाबाद येथे गेले. चौधरी हा तेथील एका फर्निचरच्या दुकानात काम करतो. त्याने मुंबईतील बँकेत तीन खाती काढली होती. त्या वेळी त्याने मोबाइल क्रमांकासह अन्य माहिती बँकेला दिली होती. संशयितांचा शोध घेताना पोलिसांनी बँकेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि तो जाळ्यात सापडला. या गुन्ह्यात अजून कोणी सहभागी आहे का, याची कसून चौकशी सुरू केली आहे.
बोलाविता धनी कोण आहे ?तपास अधिकारी अभिजित पवार, अंमलदार कृष्णा पाटील, उत्तम पाटील यांनी या प्रकरणात अनेक बँक खाती तपासली. चौधरी याने मुंबईतील बँकेत हस्तांतरित केलेला धनादेश उघडकीस आणला. त्याच्याकडून धनादेश जमा करणाऱ्यांचे खाते क्रमांक, पत्ता याची माहिती घेतली जात आहे. यामध्ये त्याचा बोलाविता धनी कोण आहे, त्यामध्ये जिल्हा परिषदेतील आणि बँकेतील काही जणांचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.