साडेसोळा लाखांचे मोबाईल परत : सायबर पोलीस ठाण्याला यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 00:40 IST2019-12-04T00:37:44+5:302019-12-04T00:40:18+5:30
मोबाईलमध्ये असलेले सोशल मीडिया अॅप वेळोवेळी लॉग आॅफ करा. मोबाईल हरविल्यानंतर वैयक्तिक अथवा बँक डिटेल्स दुसऱ्याच्या हाती पडून आर्थिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घ्या. मोबाईल हरविल्याची तक्रार पोलिसांत द्या.

जिल्हा पोलीस दलाच्या सायबर पोलीस ठाण्याने विशेष मोहीम राबवीत गहाळ झालेले व चोरीस गेलेले मोबाईल शोधले. हे मोबाईल जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते मूळ मालकांना मंगळवारी परत देण्यात आले.
कोल्हापूर : जिल्ह्यासह शहराच्या विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरीस गेलेले १६ लाख ५० हजार रुपये किमतीचे ११० मोबाईल परत मिळविण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश आले असून, ते मूळ मालकांना मंगळवारी सायंकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते परत देण्यात आले.
मागील महिन्यात शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांतून ११० मोबाईल चोरीस गेले होते. त्यांचा तपास करण्याचे काम पोलिसांची विशेष शाखा असलेल्या ‘सायबर पोलीस ठाणे’कडे होती. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत या शाखेने शोधमोहीम राबविली. त्यात ११० मोबाईल शोधून काढले. हे शोधलेले मोबाईल मूळ मालकांकडे सोपविण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यात कागदपत्रांची तपासणी करून ते मोबाईल मंगळवारी त्यांना जिल्हा पोलीस मुख्यालयात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांच्या हस्ते परत करण्यात आले. या मोबाईलची एकूण किंमत सुमारे १६ लाख ५० हजार आहे.
ही कामगिरी पोलीस निरीक्षक संजय मोरे, स. पोलीस निरीक्षक मंगेश देसाई, उपनिरीक्षक शीतल जाधव, पोलीस कर्मचारी अजय सावंत, सचिन बेंडखळे, अनिल बरगे, अमर वासुदेव, संगीता खोत, सुधीर पाटील, महादेव गुरव, सुरेश राठोड, विशाल पाटील, पूनम पाटील यांनी केली.
हरविलेला मोबाईल असा मिळू शकतो
मोबाईल विकत घेताना त्याची खरेदी पावती घ्यावी. मोबाईलचा आयएमईआय नंबर नोंद करून ठेवणे गरजेचे आहे. मोबाईलमध्ये असलेला मौल्यवान डाटा संरक्षण करण्यासाठी विशेष सांकेतिक क्रमांक (पासवर्ड) देणे गरजेचे आहे. मोबाईलमध्ये बँकेची माहिती संकलित करू नका. मोबाईलमध्ये असलेले सोशल मीडिया अॅप वेळोवेळी लॉग आॅफ करा. मोबाईल हरविल्यानंतर वैयक्तिक अथवा बँक डिटेल्स दुसऱ्याच्या हाती पडून आर्थिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घ्या. मोबाईल हरविल्याची तक्रार पोलिसांत द्या.