Kolhapur: अंबाबाईच्या किरणोत्सवाला प्रारंभ, पहिल्याच दिवशी सूर्यकिरणे देवीच्या खांद्यापर्यंत
By इंदुमती सूर्यवंशी | Updated: November 8, 2025 19:13 IST2025-11-08T19:12:18+5:302025-11-08T19:13:07+5:30
काल, शुक्रवारी ढगाळ वातावरणामुळे किरणोत्सव होऊ शकला नाही

Kolhapur: अंबाबाईच्या किरणोत्सवाला प्रारंभ, पहिल्याच दिवशी सूर्यकिरणे देवीच्या खांद्यापर्यंत
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दक्षिणायन किरणोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मावळतीची सूर्यकिरणे देवीच्या मूर्तीच्या खांद्यापर्यंत आली. ठरलेल्या तारखेच्या एक दिवस आधीच म्हणजे आज, शनिवारपासून किरणोत्सवाच्या सोहळ्याला प्रारंभ झाला.
श्री अंबाबाईचा दक्षिणायण आणि उत्तरायण असे वर्षातून दोनवेळा किरणोत्सव होतो. मात्र मागील काही वर्षांपासून त्यात बदल झाला आहे. त्यानुसार शुक्रवारपासूनच किरणोत्सवाच्या पाहणी सुरु झाली मात्र शुक्रवारी ढगाळ वातावरणामुळे किरणोत्सव होऊ शकला नाही.
शनिवारी सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी मावळतीची सूर्यकिरणे महाद्वारातून अंबाबाई मंदिरात आली. गरुड मंडप, कासव चौक, पितळी उंबरा, चांदीचा उंबरा, संगमरवरी पायरी असा एक एक टप्पा पार करत किरणांनी ५ वाजून ४२ मिनिटांनी मूर्तीचा चरणस्पर्श केला. त्यानंतर सुर्यकिरणे गुडघ्यापर्यंत, कमरेपर्यंत आली. ५ वाजून ४७ मिनिटांनी किरणे खांदयापर्यंत येऊन डावीकडे लुप्त झाली.