शक्तिपीठ महामार्गासाठी एक इंचही जमीन देणार नाही, कोल्हापुरातील बाधीत गावांचा निर्धार; अन्यथा.. 

By इंदुमती सूर्यवंशी | Published: March 11, 2024 06:23 PM2024-03-11T18:23:43+5:302024-03-11T18:25:44+5:30

निवडणुकीच्या तोंडावर रोष परवडणारा नाही - पालकमंत्री मुश्रीफ

On behalf of Shaktipeth Highway Anti Action Committee a march was held at the Collector's office in Kolhapur | शक्तिपीठ महामार्गासाठी एक इंचही जमीन देणार नाही, कोल्हापुरातील बाधीत गावांचा निर्धार; अन्यथा.. 

छाया-नसीर अत्तार

कोल्हापूर : हजारो शेतकऱ्यांना भुमिहीन करून रस्त्यावर आणणाऱ्या शक्तीपीठ महामार्गासाठी एक इंचही जमीन घेऊ देणार नाही, शासनाने जबरदस्तीने भुसंपादन सुरू केले तर आम्ही आत्महत्या करू असा जळजळीत इशारा कोल्हापुरातील संभाव्य बाधीत गावातील शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाला दिला. शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, शेती आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची, शेती वाचवा देश वाचवा, शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असो, देणार नाही देणार नाही जमीन आमची देणार नाही अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

नागपूर- गोवा शक्तीपीठ महामार्ग कोल्हापुरातील ५९ गावांमधून जाणार मोठ्या प्रमाणात शेतजमिनीचे व घरांचे संपादन केले जाणार आहे. आधीच नागपूर-रत्नागिरी महामार्गासाठी भूसंपादन झालेले आहे, पून्हा संपादन झाले तर नागरिक रस्त्यावर येतील त्यामुळे याला ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. आपला विरोध शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्यावतीने सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यात बाधीत होणाऱ्या गावातील शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

संजयबाबा घाटगे म्हणाले, वारंवार भुसंपादन करून जिल्ह्यातील भूमिपुत्रांना भूमीहीन केले जात आहे. या पट्ट्यात सर्वत्र बागायती शेती असून शेतकऱ्यांचे न भरून निघणार नुकसान होणार आहे. याआधी काळम्मावाडी धरणासाठी, कालव्यांसाठी, नागपूर-रत्नागिरी महामार्गासाठी अशा अनेक कारणांसाठी भूसंपादन झाले आहे. आता गरज नसताना शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला जात आहे, त्यासाठी कोणत्याही परिस्थितीत जमिनी देणार नाही.

गिरीष फोंडे म्हणाले, एकीकडे न्याय्य हक्कांसाठी लढताना शेतकऱ्यांचा मृत्यू होत आहे, शेतकरी स्वामीनाथन आयोगाची मागणी वर्षानुवर्षे करत आहे पण शक्तिपीठ महामार्गाची मागणी नसताना शासन कंत्राटदार, रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी व मंत्र्यांच्या ढपल्यासाठी हा महामार्ग शेतकऱ्यांच्या वर लादत आहे. दोन महामार्ग उपलब्ध असताना पर्यावरण विरोधी, टोल आकारणारा, शेतकऱ्यांना कवडीमोल नुकसान भरपाई देणारा असा हा शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहीजे. आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून ५९ गावात मेळावे घेऊन ठराव केले जातील व अध्यादेशाची होळी केली जाईल.

यावेळी उदय नारकर, शिवाजी मगदूम, दादा पाटील, आनंदा पाटील, पूजा मोरे. नामदेव पाटील यांच्यासह किसान सभेचे कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवडणुकीच्या तोंडावर रोष परवडणारा नाही..

पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, महामार्गाला शेतकऱ्यांच्या असलेल्या तीव्र विरोधाची कल्पना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना दिली जाईल. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचा रोष पत्करणे योग्य नाही. त्यामुळे लवकरच यासाठी बैठक घेण्यासाठी प्रयत्न करेन.

Web Title: On behalf of Shaktipeth Highway Anti Action Committee a march was held at the Collector's office in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.