चप्पलच्या शंभर डिझाईन पाहिल्या... प्राडा म्हणाली, ‘वॉव ‘कोल्हापुरी’ ग्रेट’
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 15:54 IST2025-07-17T15:54:18+5:302025-07-17T15:54:38+5:30
कुरुंदवाडी, कापशी, पुडा अन् थेट पाकीटमध्ये बसू शकणारी फोल्डिंगची चप्पल पाहून प्राडाच्या अधिकाऱ्यांनी कोल्हापुरी चपलेची वाहवा केली

चप्पलच्या शंभर डिझाईन पाहिल्या... प्राडा म्हणाली, ‘वॉव ‘कोल्हापुरी’ ग्रेट’
कोल्हापूर : एकाच लाईनमध्ये असणारी ६० दुकाने, दुकानासमोर स्वच्छता अन् सर्व दुकानांमध्ये लावलेल्या कोल्हापुरी चपलांच्या शंभराहून अधिक डिझाईन पाहून इटालियन प्राडा कंपनीचे अधिकारी बुधवारी अवाक् झाले. आवाज येणारी कुरुंदवाडी, कापशी, पुडा अन् थेट पाकीटमध्ये बसू शकणारी फोल्डिंगची चप्पल पाहून ‘वॉव, ग्रेट कोल्हापुरी’ या शब्दांत प्राडाच्या अधिकाऱ्यांनी कोल्हापुरी चपलेची वाहवा केली.
दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या प्राडाच्या टेक्निकल टीमने बुधवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील चप्पल लाईनला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी दुकानदारांशी थेट संवाद साधला. यावेळी पाऊलो टिव्हरॉन, डॅनिएल कोंटू, आंद्रिया पॉलास्ट्रेली, रॉबर्टो पोलास्ट्रेली व ऑड्रिया बॉस्करो यांच्यासह महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे उपस्थित होते.
चप्पल लाईनमध्ये आल्यानंतर या टीमने चार दुकानांमध्ये भेटी देत तेथील चपलांच्या विविध डिझाईन पाहिल्या. पुडा, कापशी, कुरुंदवाडी या लाईटवेट चपलांनी या टीमला अक्षरश: भुरळ घातली. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या काळात बनवल्या गेलेल्या काही चपला पाहून या टीमने कारागिरांचे कौतुक केले. यावेळी भूपाल शेटे, शिवाजी पोवार, जयेश ओस्वाल, वसंत पाटील उपस्थित होते.
सव्वाशे वर्षांपूर्वी अशी चप्पल बनवली गेली ?
येथील दुकानदारांनी कोल्हापूरमध्ये सव्वाशे वर्षांपासून बनवल्या जात असलेल्या काही चपला या टीमला दाखवल्या. त्या चपलांचे डिझाईन पाहून सुरुवातीला या टीमला ते खरे वाटले नाही. दुकानदारांनी त्या काळातले काही फोटो दाखवल्यानंतर या टीममधील सदस्यांनी वॉव, ग्रेट, ग्रेट, कोल्हापुरी ग्रेट म्हणत कारागिरांच्या कलेला दाद दिली. विशेष म्हणजे शाहूकालीन चपला हातात घेऊन ते उशिरापर्यंत न्याहाळत होते.
पुडापेक्षा भारी चप्पल
प्राडाने त्यांच्या फॅशन शोमध्ये कोल्हापुरी पद्धतीची जी पुडा चप्पल ठेवली होती, ती चप्पलही या टीमने या दुकानांमध्ये पाहिली. मात्र, कोल्हापुरी पद्धतीच्या विविध डिझाईन पाहिल्यानंतर या टीमने पुडा तर काहीच नाही, त्यापेक्षा कितीतरी भारी चप्पल कोल्हापुरात तयार होतात, अशा प्रतिक्रिया दिल्या.