नूतन नगरसेवक विधानपरिषदेच्या बहुमोल मताला चुकणार

By Admin | Updated: November 9, 2016 01:15 IST2016-11-09T01:15:00+5:302016-11-09T01:15:00+5:30

२०८ नगरसेवक : विधानपरिषदेपूर्वी संपणार नगरसेवकांची मुदत

Nutan corporator missed the valuable vote of the Legislative Council | नूतन नगरसेवक विधानपरिषदेच्या बहुमोल मताला चुकणार

नूतन नगरसेवक विधानपरिषदेच्या बहुमोल मताला चुकणार

समीर देशपांडे -- कोल्हापूर -जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांचे २0८ नूतन नगरसेवक २0२१ सालच्या विधान परिषदेच्या निवडणूक मतदानाला मुकणार आहेत. २0२१ सालची विधान परिषद जाहीर होण्याआधी या निवडून आलेल्या नगरसेवकांची मुदत संपणार असल्याने त्यांना हा मतदानाचा अधिकार राहणार नाही. त्यामुळे साहजिकच या बहु‘मोल’ मतदानापासून या २0८ जणांना वंचित राहावे लागणार आहे. २00९ च्या निवडणुकीतही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती.
कोल्हापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक डिसेंबर २0१५ मध्ये पार पडली. आमदार सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक यांच्यातील हा संघर्ष पश्चिम महाराष्ट्रामध्ये चर्चेला आला होता. या निवडणुकीआधी सतेज पाटील यांनी पाच वर्षांपूर्वीच्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये पायाला भिंगरी बांधून आगामी विधान परिषद डोळ्यासमोर ठेवून नियोजन केले होते. त्या बळावरच २२0 मते मिळवित महादेवराव महाडिक यांच्यापेक्षा ६३ मते अधिक घेऊन पाटील यांनी बाजी मारली होती.
या पार्श्वभूमीवर २0२१ साली होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास २८ नोव्हेंबरला निवडून येणारे कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांचे २0८ नगरसेवक आणि ९ नगराध्यक्ष यांची मुदत आधी संपत असल्याने या निवडणुकीत ते मतदान करू शकत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
आगामी विधान परिषदेची निवडणूक ही डिसेंबर २0२१ साली होणार आहे. तर आता निवडून येणाऱ्या नगरसेवकांची मुदत नोव्हेंबर २0२१ सालीच संपणार आहे. विधान परिषदेच्या आमदारांचा कालावधी सहा वर्षांचा, तर नगरसेवकांचा कालावधी पाच वर्षांचा याचा हा परिणाम आहे. विधान परिषद निवडणूक होऊन दहा महिने झाले असले तरी निवडणूक आयोग जी मतदार यादी तयार करेल त्या यादीत या नगरसेवकांची नावे असण्याची शक्यता नाही.


अमूल्य मताची संधी जाणार
विधान परिषदेची निवडणूक म्हटल्यानंतर कुणी किती घेतले याची चर्चा नंतर महिनाभर सुरू असते. पाटील-महाडिक यांच्यातील अटीतटीच्या लढतीत तर आकडे ऐकून डोळे पांढरे होण्याची वेळ आली होती. यातील खरे खोटे किती? हा मुद्दा वेगळा असला तरी लाखो रुपये खर्चून नगरसेवक होणाऱ्यांना विधान परिषदेचे मतदान करता येणार नसल्याची मोठी रुखरुख लागून राहणार, हे नक्की.

२00९ साली विधान परिषदेची जी निवडणूक झाली, त्यावेळीही जिल्ह्यातील नगरपालिकांच्या नगरसेवकांना मतदानाची संधी नव्हती. मात्र, २0१५च्या निवडणुकीत मात्र हे नगरसेवक मतदानासाठी पात्र होते. आता पुन्हा २00९ ची पुनरावृत्ती होणार असून, येणाऱ्या विधान परिषदेसाठी या नगरसेवकांना मतदानाची संधी असणार नाही.
- आमदार सतेज पाटील


नगरपालिका व नगरसेवक संख्या
१. इचलकरंजी६२
२. जयसिंगपूर२४
३. कागल२0
४. वडगाव१७
५. गडहिंग्लज१७
६. कुरूंदवाड१७
७. मुरगुड१७
८. मलकापूर१७
९. पन्हाळा१७
एकूण २0८


हा तर ‘जर तर’चा विषय
याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करता, हा ‘जर तर’ चा विषय असून, त्यावेळी निवडणूक आयोग कोणत्या तारखेपासून मतदारांची यादी गृहित धरणार आहेत, त्यावरच हा विषय अवलंबून असेल, असे मत व्यक्त केले.

Web Title: Nutan corporator missed the valuable vote of the Legislative Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.