यांत्रिकीकरणाने बैलांची संख्या घटली
By Admin | Updated: July 11, 2014 00:11 IST2014-07-10T23:54:48+5:302014-07-11T00:11:38+5:30
दूध व्यवसायाचाही बैलांच्या संगोपनावर परिणाम : जिल्ह्यात ‘देशी’, ‘खिल्लारी’ दोनच जाती

यांत्रिकीकरणाने बैलांची संख्या घटली
कोल्हापूर : जिल्ह्यात देशी, खिल्लारी, एच.एफ. संकरित व जर्शी संकरित या जातींचे बैलच आढळतात. यामध्ये प्रामुख्याने देशी व खिल्लारी जातींच्या बैलांची संख्या लक्षणीय आहे. उर्वरित महाराष्ट्रात आढळणारे ‘डांगी’ व ‘गीर’ जातींचे बैल येथे दिसत नाहीत. गेल्या १५ वर्षांत जिल्'ात दूध व्यवसायाने बदललेल्या जीवनाचा थेट परिणाम बैलांच्या संख्येवर झालेला दिसतो. पूर्वी प्रत्येक घरात एक तरी देशी गाय होती. आता देशी गायींची संख्या कमी झाली आहे. देशी गायींची जागा जादा दूध देणाऱ्या संकरित गायींनी घेतली आहे. संकरित गायींपासून जन्मलेल्या नर वासरांच्या संगोपनाची मानसिकता शेतकऱ्यांची नसते. मादी वासरू असेल तरच त्याचे संगोपन केले जाते. त्यामुळे एकीकडे संकरित गायींची संख्या वाढली असली तरी त्या पटीत संकरित बैलांची संख्या वाढलेली दिसत नाही.
शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाचा उदय झाला, पण गेल्या दहा वर्षांत दूध व्यवसाय हा प्रमुख व्यवसाय बनला आहे. दहा दिवसाला मिळणाऱ्या दुधाच्या बिलामुळे शेतकरी दूध व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणात वळला आहे. पूर्वी दोन बैलांच्या जोडीला गोठ्यात एक-दोन म्हैस किंवा गाय असायची. आता गोठ्यांचे चित्र बदलले आहे. जमीन आहे तेवढीच आहे, पण कुटुंबांची संख्या वाढली आहे. मशागतीचे क्षेत्र कमी झाल्याने बैलजोडी पाळणे परवडत नाही. वर्षातून दोनवेळा मशागत करण्यासाठी रोटावेटर, लहान ट्रॅक्टरचा वापर करणे सोयीस्कर होऊ लागले आहे. त्यासाठी ५० हजारांची बैलजोडी वर्षभर सांभाळणे आर्थिकदृष्ट्या बेहिशेबी वाटत असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरणाकडे वळला आहे.