Maratha Reservation: आता सरकारला वाकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, कोल्हापुरातील धरणे आंदोलनात मराठा समाजाचा इशारा
By भारत चव्हाण | Updated: October 2, 2023 15:48 IST2023-10-02T15:47:01+5:302023-10-02T15:48:04+5:30
कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर वणवा उठला आहे. आतापर्यंत राज्यकर्त्यांनी मराठा समाजाची केवळ फसवणूक केली आहे. येथून पुढे ...

Maratha Reservation: आता सरकारला वाकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, कोल्हापुरातील धरणे आंदोलनात मराठा समाजाचा इशारा
कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर वणवा उठला आहे. आतापर्यंत राज्यकर्त्यांनी मराठा समाजाची केवळ फसवणूक केली आहे. येथून पुढे आरक्षण घेतल्याशिवाय, प्रसंगी सरकारला वाकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा सोमवारी सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी येथे झालेल्या धरणे आंदोलनावेळी दिला.
कोल्हापूर शहरात पापाची तिकटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी हा इशारा देण्यात आला. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत बाबा इंदूलकर, दिलीप देसाई, बाबा पार्टे गांधी जयंतीपासून आमरण उपोषणास बसणार होते, परंतु जालना येथील जरांगे पाटील यांना चाळीस दिवसांची मुदत दिली असल्याने आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करुन गांधी जयंती दिनी दोन तासाचे धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात बाबा इंदूलकर, दिलीप देसाई, बाबा पार्टे यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, कॉग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी महापौर ॲड. महादेवराव आडगुळे, ॲड. प्रशांत देसाई, ॲड. शिवाजीराव राणे, ॲड. नलवडे, ॲड. अजित मोहिते, शिवसेनेचे संजय पवार, विजय देवणे, रविकिरण इंगवले, दुर्वास कदम, डॉ. बुलबुले, वैशाली महाडिक यांच्यासह अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला.
राज्य शासन मराठ्यांना आरक्षण देणार असे सांगत असले तरी ते न्यायलयात टिकणारे नाही. शासन आम्हाला फसवतंय. आता आम्ही जागे आहोत. आम्ही शासनाला स्वस्थ बसून देणार नाही. उद्रके झाला आहे. त्याची सुरवात कोल्हापुरातून झाली आहे. येणारा काळ दाखवून देईल की सकल मराठा काय करु शकतो. शासनाला जाग्यावरुन हलविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आरक्षण आम्ही मिळवून दाखविणारच. टिकणारे आरक्षण मिळण्यासाठी या शासनाला वाकविण्याची वेळ आली तर मराठा समाज शंभर टक्के शासनाला वाकवेल, असा इशारा बाबा इंदूलकर यांनी यावेळी दिला.