‘दौलत’ची आता विक्रीच : सहकारमंत्री
By Admin | Updated: April 12, 2015 00:59 IST2015-04-12T00:59:53+5:302015-04-12T00:59:53+5:30
कर्ज फेडून कारखाना सुरू करणे अशक्य

‘दौलत’ची आता विक्रीच : सहकारमंत्री
कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील दौलत सहकारी साखर कारखान्यावर ३८३ कोटींचे कर्ज आहे. नवा कारखाना ५० कोटींत उभारता येतो. त्यामुळे कर्ज फेडून पुन्हा कारखाना सुरू करणे शक्य नाही. परिणामी कर्ज भागविण्यासाठी ‘दौलत’ची विक्री करण्याशिवाय पर्याय नाही, अशी माहिती सहकारमंत्री व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी मुंबईत सह्याद्री अतिथिगृहात आयोजित पत्रकार
परिषदेत दिली.
एका खासगी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. परिणामी आता ‘दौलत’च्या विक्रीवर शिक्कामोर्तब झाले आहे. ‘दौलत’ शेतकऱ्यांच्या मालकीचाच राहावा तसेच जिल्हा बँकेने तो लिलावात काढू नये, यासाठी दौलत बचाव ठेव योजना सुरू करण्याचा निर्णय शुक्रवारी कारखाना कार्यस्थळावर झालेल्या कामगार व वाहतूकदारांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. असे एका बाजूला प्र्रयत्न सुरू असताना दुसऱ्या बाजूला मंत्री पाटील यांनी ‘दौलत’ची विक्रीच करावी लागेल, असे स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे आता दौलत बचाव कृती समिती, वाहतूकदार, कामगार यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे.
गेल्या तीन वर्षांपासून हा कारखाना बंद आहे. जिल्हा बँकेचे फेब्रुवारी २०१५ अखेर ६० कोटी ७७ लाख ६० हजार रुपयांचे कर्ज कारखान्याकडून थकीत आहे. याशिवाय कामगारांचा पगार, वाहतूकदारांचे भाडे, ऊस उत्पादकांची देय बिले असे एकूण ३८३ कोटी रुपयांचे कारखान्यांवर कर्ज आहे. कर्जातून मुक्त करून धुराडे पेटविणे आव्हानात्मक आहे. दरम्यान, व्यवस्थापन आणि कंपनीने बँकेच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. गेल्या महिन्यात थिटे पेपर्स कंपनीने दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. बँकेला येणी वसूल करण्याचा मार्ग खुला झाला आहे. कारखाना विक्री करणे किंवा चालविण्यास घेतलेल्यांकडून कर्जाची रक्कम वसूल करणे असे दोन पर्याय बँकेसमोर आहेत.
पहिल्यांदा कर्ज भरण्याच्या अटीवर कारखाना भाड्याने देण्याची निविदा काढली आहे. ९ एप्रिलपासून प्रक्रिया सुरू आहे. अजूनपर्यंत एकही कंपनी पुढे आलेली नाही. १७ तारखेपर्यंत निविदेची मुदत आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री पाटील यांनी कारखाना विक्री करूनच कर्ज भागवावे लागणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे चंदगड तालुक्याच्या ‘दौलत’ची विक्री पाहण्याची वेळ उत्पादक, कामगार यांना येणार आहे. (प्रतिनिधी)