महादेवी हत्ती परत येणार?, वनतारा सीईओंसोबतच्या बैठकीतून मठाचे महास्वामी बाहेर पडले, नेमकं काय घडलं.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 19:06 IST2025-08-01T19:06:13+5:302025-08-01T19:06:44+5:30
'वनतारा सर्व ते सहकार्य करेल'

महादेवी हत्ती परत येणार?, वनतारा सीईओंसोबतच्या बैठकीतून मठाचे महास्वामी बाहेर पडले, नेमकं काय घडलं.. वाचा
कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे गुजरातमधील वनतारा मध्ये पाठवण्यात आलेल्या नांदणी मठातील महादेवी हत्तीणीसाठी आता न्यायालयीन लढाई लढावी लागणार आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणे गरजेचे आहे. त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया केली जाणार आहे. आज, शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात वनताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी व नांदणी मठाचे मठाधीश यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनंतर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी ही माहिती दिली.
नांदणी जैन मठातील महादेवी हत्तीणीला गुजरातमधील वनतारामध्ये नेल्यानंतर वनताराबद्दल नांदणीकरांसोबतच कोल्हापुरवासियांबद्दल प्रचंड असंतोष होता. त्यातूनच बॉयकॉट जिओ, १ लाख सह्यांची मोहिम सुरू झाली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर खासदार धनंजय महाडीक व धैर्यशील माने यांच्या प्रयत्नातून आज, शुक्रवारी वनताराची टीम नांदणी मठाधीशांसोबत चर्चेसाठी कोल्हापुरात दाखल झाली. मात्र, बैठकीतून महास्वामी तडकाफडकी बाहेर पडले. यानंतर माध्यमांशी बोलायला स्वामीजींनी नकार दिला. बैठकीतून का बाहेर पडले यामागचे कारण अस्पष्ट आहे.
बैठकीबाबत पालकमंत्री आबिटकर यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, नांदणी मठाने सर्व कायदेशीर बाबी पूर्ण कराव्यात वनतारा त्यासाठी सर्व ते सहकार्य करेल असं वनताराच्या सीईओंनी स्पष्ट केले. जर कोर्टाच्या सूचना आल्या तर आम्ही त्यापद्धतीने कार्यवाही करू. आमचा या प्रकरणाशी संबंध नाही असं वनताराच्या सीईओंनी म्हटल्याचं आबिटकरांनी माहिती दिली.
मठाधिपती तडकाफडकी बैठकीतून निघाले बाहेर..