कोल्हापूर : रत्नागिरी-नागपूर महामार्गाच्या कामाबद्दल म्हणणे मांडण्यासाठी एनएचएआयला (राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) नोटीस काढण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने गुरुवारी (दि. २०) झालेल्या सुनावणीत दिला. याबाबत हेरवाड (ता. शिरोळ) येथील सामाजिक कार्यकर्ते ॲड. अतुल चौगुले यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. पुढील सुनावणी १८ डिसेंबरला होणार आहे.रत्नागिरी-नागपूर महामार्गाचे काम कोल्हापूर ते रत्नागिरी दरम्यान रखडले आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी ॲड. चौगुले यांनी सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल केली आहे. यावर न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि अजित काडेठाणकर यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्यांच्यावतीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ॲड. श्रीकृष्ण गनबावले, यांनी तर न्यायालयात प्रत्यक्ष ॲड. शंतनू पाटील आणि याचिकाकर्ते ॲड. चौगुले यांनी भूमिका मांडली. या सुनावणीत नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियामार्फत कोणीच हजर न झाल्याबद्दल न्यायमूर्तींनी नाराजी व्यक्त केली. तसेच येत्या १८ डिसेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीसाठी हजर राहण्याबाबतची नोटीस काढण्याचा आदेश दिला.
Web Summary : Kolhapur High Court orders notice to NHAI regarding delayed Nagpur-Ratnagiri highway work. Hearing set for December 18th following public interest litigation.
Web Summary : कोल्हापुर उच्च न्यायालय ने नागपुर-रत्नागिरी राजमार्ग में देरी पर एनएचएआई को नोटिस जारी किया। जनहित याचिका के बाद 18 दिसंबर को सुनवाई तय।