यापुढे कुणबी उमेदवारांना मतदान नाही, कोल्हापुरात ओबीसी सर्वपक्षीय राजकीय मेळाव्यात ठराव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 17:57 IST2025-09-10T17:56:00+5:302025-09-10T17:57:07+5:30

ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल, तर रस्त्यावर उतरून लढू

No more voting for Kunbi candidates resolution passed at OBC all party political rally in Kolhapur | यापुढे कुणबी उमेदवारांना मतदान नाही, कोल्हापुरात ओबीसी सर्वपक्षीय राजकीय मेळाव्यात ठराव 

छाया : नसीर अत्तार

कोल्हापूर : आजवर सर्व राजकीय पक्षांनी फक्त मतदानापुरता ओबीसींचा वापर केला आहे. निवडणुकीपुरती आपली पोळी भाजून घेतात व नंतर निघून जातात, ओबीसींचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना आता आरक्षणावरही गदा आणली जात आहे. आम्ही हे सहन करणार नाही. ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल, तर रस्त्यावर उतरून लढू. यापुढे कुणबी उमेदवारांना मतदान करणार नाही, असा ठराव ओबीसी सर्वपक्षीय राजकीय मेळाव्यात मंगळवारी करण्यात आला.

ओबीसी जनमोर्चाच्या वतीने अक्कमहादेवी मंटप येथे झालेल्या मेळाव्यात हा निर्धार करण्यात आला. अध्यक्षस्थानी राज्य सरचिटणीस दिगंबर लोहार होते. तत्पूर्वी, बिंदूचौक येथील महात्मा ज्योतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून मिरवणुकीस सुरुवात झाली. यावेळी ओबीसी आरक्षणातील घुसखोरी थांबलीच पाहिजे, हैदराबाद गॅझेट रद्द झालेच पाहिजे, शिंदे समिती रद्द झालीच पाहिजे, ओबीसी एकजुटीचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या.

लोहार म्हणाले, मतांसाठी वापर करून हातात सत्ता आल्यानंतर ओबीसींचे आरक्षण संपवण्याचाच प्रयत्न केलेल्या राजकीय पक्षांपासून सावध राहावे. सर्वच राजकीय पक्ष ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, असे म्हणतात; परंतु ओबीसी आरक्षण फक्त कुणबीमय केले आहे. खऱ्या ओबीसींना आरक्षणाचा लाभ होत नाही. म्हणजेच या सर्वच राजकीय पक्षांनी ओबीसींना संपवण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी ओबीसींनी आपल्या एकीची वज्रमूठ बांधून सरकारला वठणीवर आणले पाहिजे.

जिल्हाध्यक्ष शिवाजी माळकर यांनी स्वागत केले. यावेळी ओबीसी बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष एकनाथ कुंभार, रणजीत पोवार, संतोष माळी, मारुती टिपुगडे, संभाजी पोवार, संदीप कुंभार यांनी ओबीसी आरक्षणात घुसखोरी सहन करणार नाही, असे प्रतिपादन केले. अर्चना गुरव, महेश यादव, सचिन सुतार, माजी नगरसेवक प्रकाश कुंभार सावर्डेकर, मुस्लीम ओबीसी संघटनेचे मुसा पटवेगार यांनी वंचितचे अरुण सोनवणे, धनगर समाज संघटनेचे संजय वाघमोडे, यशवंत शेळके, विद्या बनसोडे, सीताराम चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. ज्ञानेश्वर सुतार व काशीनाथ माळी यांनी सूत्रसंचालन केले. पंडित परीट यांनी आभार मानले.

Web Title: No more voting for Kunbi candidates resolution passed at OBC all party political rally in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.