कोल्हापूर : गेली अनेक वर्षे एकामागोमाग बसलेले विद्यार्थी हे चित्र आता कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने बदलले आहे. पाठीमागच्या बाजूला नेहमी बसणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नकारात्मक भावना वाढू नये आणि त्यांच्यामध्येही आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी गोलाकार बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. अशा पद्धतीची बैठक व्यवस्थेची अंमलबजावणी करणारा कोल्हापूर हा राज्यातील पहिला जिल्हा असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी दिली. ‘मिशन ज्ञान कवच’ असे या उपक्रमाला नाव देण्यात आले आहे.पुढच्या बाकावर बसणारे विद्यार्थी हे नेहमी प्रश्नांना उठून उत्तरे देतात. साहजिकच अनेकदा शिक्षकांचेही पुढे बसणाऱ्या मुलांकडे अधिक लक्ष जाऊ शकते. समाजामध्येही पाठीमागच्या बाकांवर बसणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत एक वेगळी भावना असते. अशा बैठक रचनेमुळे अनेकदा पाठीमागे बसणाऱ्या मुलांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव जाणवू शकतो. केरळ राज्यातील मल्याळम भाषेमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या माध्यमातून प्राथमिक शाळेतील विद्यार्थी बसण्याची वेगळी पद्धत दाखवण्यात आली होती. त्यानुसार केरळ राज्यात 'बॅक-बेंचर' संकल्पना दूर करून यू-आकाराच्या बसण्याच्या पद्धतीचे मॉडेल स्वीकारले गेले आणि शाळांमध्ये तशी बैठक व्यवस्था करण्यात आली. हीच संकल्पना कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्याबाबत कार्तिकेयन यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांच्याशी चर्चा केली आणि तातडीने अंमलबजावणीही सुरू झाली.
सर्व विद्यार्थ्यांकडे समान लक्षया पद्धतीमध्ये शिक्षक वर्गाच्या मध्यभागी उभे राहतात आणि प्रत्येक मुलाकडे समान लक्ष देऊ शकतात. शिक्षक विद्यार्थ्यांची संपूर्ण देहबोली पाहू शकतात. ज्या शाळांमधील वर्गांची पटसंख्या कमी आहे अशा शाळांमध्ये मुख्याध्यापकांनी अशी बैठक रचना तयार करण्यात आली आहे. शिक्षकांच्या सूचना प्रभावीपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असून, त्याचा विधायक परिणामही वर्गात दिसून येत असल्याचे सांगण्यात आले.