नको खांडोळी, युवकांची चूल वेगळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:59 IST2021-01-13T04:59:30+5:302021-01-13T04:59:30+5:30
मोहन सातपुते उचगाव : पाच वर्षांत नऊ सरपंच व ८ उपसरपंच...सलगपणे कुणालाच आपल्या पदाचा कालावधी न मिळाल्याने ...

नको खांडोळी, युवकांची चूल वेगळी
मोहन सातपुते
उचगाव : पाच वर्षांत नऊ सरपंच व ८ उपसरपंच...सलगपणे कुणालाच आपल्या पदाचा कालावधी न मिळाल्याने विकासासाठी अडसर निर्माण झाल्याने तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या तामगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत थेट युवकांनी खांडोळीला पायबंद घालण्यासाठी वेगळी चूल मांडली आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीची निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. तामगाव ग्रामपंचायतीसाठी १३ जागांसाठी तीन पॅनल रिंगणात उतरले आहेत. यासाठी ४२ उमेदवार नशीब अजमावीत आहेत. गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील परिसराचा काही भाग (कारखाने) तामगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतो. मोठा आर्थिक फायदा ग्रामपंचायतीला होतो. त्यामुळे ही ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी सर्वच गटांनी कंबर कसली आहे. जेवणावळी, छुप्या बैठका, फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. तामगावमध्ये श्री शिवशाहू स्वाभिमानी परिवर्तन आघाडीचे १३, सतेज पाटील ग्रामविकास आघाडीचे १३, तर युवकांनी स्थापन केलेल्या जनकल्याण आघाडीचे ११ उमेदवार रिंगणात आहेत. अपक्षांनीही शड्डू ठोकला आहे.