Ladki Bahin Yojana: दिवसभर सर्व्हर डाऊन, कोल्हापुरात ‘ई-केवायसी’साठी लाडक्या बहिणींची नाइट ड्यूटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 18:14 IST2025-11-07T18:12:54+5:302025-11-07T18:14:06+5:30
रात्री सर्व्हर पळतोय वेगाने

संग्रहित छाया
कोल्हापूर : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना ई-केवायसी करण्यासाठी नाइट ड्यूटी करावी लागत आहे. राज्यभरातल्या लाडक्या बहिणी ही प्रक्रिया करत असल्याने दिवसभर सर्व्हर डाऊन होतो आणि रात्री ९ वाजल्यापासून ते सकाळी ६ वाजेपर्यंत वेगाने पळत असल्याने या वेळेतच महिलांना ई-केवायसी करावी लागत आहे. जिल्ह्यात या योजनेच्या १० लाख महिला लाभार्थी आहेत.
लाडकी बहीण योजनेत पारदर्शकता यावी, निकषात बसत नसतानाही योजनेचा लाभ घेत असलेले बोगस लाभार्थी लक्षात यावेत, यासाठी राज्य शासनाने योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांसाठी ई-केवायसी सक्तीची केली आहे. मात्र, योजनेच्या लाभासाठीचे ऑनलाइन अर्ज भरताना ज्याप्रमाणे सर्व्हर डाऊनच्या अडचणी येत होत्या, तोच ताप आता ई-केवायसी करताना होत आहे.
राज्यातील सर्वच जिल्ह्यांमधील लाडक्या बहिणी ई-केवायसी करत असल्याने सर्व्हरवर ताण येऊन सर्व्हर डाऊन होत आहे. त्यामुळे मोजून पाच मिनिटांत होणाऱ्या या प्रक्रियेसाठी रात्री ९ वाजेपर्यंतची वाट पाहावी लागत आहे. कारण त्यानंतरच सर्व्हरवरील ताण कमी होऊन तो वेगाने पळत आहे.
ई-केवायसीसाठी १७ तारखेपर्यंतची मुदत असल्याने सगळ्यांनाच आता त्याची घाई झाली आहे. त्यामुळे सर्व्हरवर ताण येत आहे.
ही वेगळीच अडचण
ई-केवायसीची प्रक्रिया मोबाइल, ई-सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र अशा कोणत्याही ठिकाणी करता येते; पण अनेकदा महिलांना स्वत:ला मोबाइलवर हे करता येत नाही आणि रात्री ९ नंतर उशिरापर्यंत महा ई-सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र सुरू राहत नाहीत. त्यामुळे प्रक्रिया करायची कधी? अशी अडचण निर्माण झाली आहे.
गेले तीन दिवस मी ई-केवायसी करायचा प्रयत्न करत होते. ही प्रक्रिया करण्यासाठी ओटीपी येतो. तो दहा मिनिटांसाठीच व्हॅलिड असतो; पण दहा मिनिटांत तो कधीच येत नाही. येतो तेव्हा मुदतीची वेळ संपून गेलेली असते. अखेर रात्री १० नंतर माझी ई-केवायसी झाली. - प्रियांका सावंत, साने गुरुजी वसाहत