कोल्हापूर : सरत्या वर्षाला निरोप देताना नवी उमेद घेऊन कोल्हापूरकरांनी मंगळवारी मध्यरात्रीनंतर नव्या वर्षाचे मोठ्या धुमधडाक्यात स्वागत केले. २०२४ ला गुडबाय करत २०२५ या नव्या वर्षाचे संगीताच्या तालावर थिरकत, फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोषात स्वागत केले. अनेकांनी नववर्षानिमित्त संकल्प सोडत तो पूर्ण करण्याचा निश्चयही केला. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी कोल्हापुरातील रस्ते पहाटेपर्यंत फुलले होते. त्यामुळे अंबाबाईसह जोतिबा व इतर धार्मिक स्थळांवर भाविकांची प्रचंड गर्दी होती. सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी करणारे आणि मद्यप्राशन करून वाहन चालवणा-या ५३ जणांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. शहरात मंगळवारी संध्याकाळपासूनच ‘न्यू इयर’च्या सेलिब्रेशनला सुरुवात झाली. नागरिकांनी रात्री बाराच्या ठोक्याला मित्रमंडळींना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देऊन सरत्या वर्षाला निरोप दिला. घराघरांतही नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी छोटेखानी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. कुटुंबासह वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा बेत आखून घरच्या घरीच अनेकांनी सेलिब्रेशन करणे पसंत केले. रात्री उशिरापर्यंत शहरातील सर्व रस्ते गजबजले होते.रंकाळ्यावरही तरुणाईने मोठी गर्दी केली होती. शहरातील अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार, पबमध्ये नव्या वर्षाचे जोरदार स्वागत झाले. अनेक ठिकाणी तरुणाईचे लक्ष वेधून घेण्यासाठी डीजे आणि लाइव्ह म्युझिकचा थाट अनुभवयाला मिळाला. दरम्यान, मंगळवारी संध्याकाळनंतर कोल्हापूर शहरातील अनेक ठिकाणी तरुण-तरुणींनी गर्दी करून नववर्षाची पूर्वसंध्याही जल्लोषात साजरी केली. या सगळ्या जल्लोषाच्या वातावरणात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.होम डिलिव्हरीला पसंतीसरत्या वर्षाला निरोप देताना शहरातील विविध हॉटेल्समध्ये तसेच फार्महाउसवर ३१ डिसेंबरच्या रात्री खवय्यांसाठी खास सोय करण्यात आली होती. पंचतारांकित हॉटेलपासून अगदी खाद्यपदार्थांच्या गाड्यांवरही लोकांनी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी मोठी गर्दी केली. अनेक नागरिकांनी हॉटेलमधून लज्जतदार खाण्याची पार्सल ऑर्डर दिली. त्यामुळे पार्सल सेवा पुरवणाऱ्या तरुणांची घाई उडाल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसत होते.
फार्महाउस फुल्लकोल्हापूर शहरासह आसपासच्या परिसरातील पर्यटनस्थळे, फार्महाउस आणि रिसॉर्टवर अनेकांनी नववर्षाचे स्वागत केले. त्यामुळे शहराच्या जवळची सर्वच फार्महाउस फुल्ल झाली होती.
सोसायट्यांमध्ये रंगल्या मैफलीअनेक सोसायट्यांमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी विविध सांगीतिक कार्यक्रम घेण्यात आले. तरुण मंडळे, सामाजिक संस्थांनीही सामाजिक उपक्रम राबवून नववर्षाचे अनोखे स्वागत केले. काही सोसायट्यांमध्ये गोड पदार्थांचे वाटप करण्यात आले.
मद्यपी, हुल्लडबाजांना दणका, पहाटेपर्यंत ८०० पोलिस रस्त्यांवरसार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी करणारे आणि मद्यप्राशन करून वाहन चालवणा-या ५३ जणांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. जिल्ह्यात ५० ठिकाणी नाकाबंदी करून पोलिसांनी वाहनांची तपासणी केली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बुधवारी पहाटेपर्यंत सुमारे ८०० पोलिस बंदोबस्तासाठी रस्त्यांवर होते.३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली होती. शहरासह जिल्ह्यात ५० ठिकाणी नकाबंदी करून संशयास्पद वाहनांची तपासणी करण्यात आली. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ३२९ जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. यांच्याकडून १ लाख ८४ हजार रुपयांचा दंड वसूल केला. यातील ४३ कारवाया ड्रंक अँड ड्राईव्हच्या आहेत. यातील १० जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे, तर इतरांना समज देऊन आणि आर्थिक दंड आकारून सोडून दिले. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्वत: रात्री उशिरा अनेक ठिकाणी फिरून पाहणी केली.
भरारी पथकांची नजरअवैध दारू, अंमली पदार्थांची वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाची भरारी पथके कार्यरत होती. सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर दारू पिणा-यांना हटकण्यासह हुल्लडबाजांवर कारवाया करण्याचे काम भरारी पथकांनी केले.
पोलिसांकडून ऑल आउट मोहीमहद्दपार, तडीपार आणि सराईत गुन्हेगार शहरात वास्तव्य करून अवैध धंदे करतात. अशा गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांनी मंगळवारी रात्री ऑल आउट मोहीम राबवली. सर्व पोलिस ठाण्यांनी त्यांच्या हद्दीतील सराईतांचा शोध घेण्यासाठी संशयितांची घरे, परिसरातील लॉज, हॉटेल्स या ठिकाणी शोधमोहीम राबवली.