राज्यात स्वच्छाग्रहींची होणार नव्याने नेमणूक; प्रोत्साहन रक्कमही देणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 06:15 IST2018-12-23T06:14:54+5:302018-12-23T06:15:18+5:30
देश हागणदारीमुक्त करण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यास राज्यात पुन्हा नव्याने स्वच्छाग्रही नेमण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने घेतला आहे.

राज्यात स्वच्छाग्रहींची होणार नव्याने नेमणूक; प्रोत्साहन रक्कमही देणार
- समीर देशपांडे
कोल्हापूर : देश हागणदारीमुक्त करण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यास राज्यात पुन्हा नव्याने स्वच्छाग्रही नेमण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने घेतला आहे. त्यांना प्रोत्साहनपर रक्कम दिली जाणार असून, त्यासाठी ५५ लाख ६६ हजार रुपयांची तरतूदही करण्यात केली आहे.
संपूर्ण देश २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत हागणदारीमुक्त करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सध्या देशभर ही चळवळ राबविली जात आहे. यालाच बळ देण्यासाठी आता गावागावांमध्ये स्वच्छाग्रही नेमण्यात येणार आहेत. याआधीही ते नेमण्यात आले आहेत. मात्र, केवळ स्वेच्छेने काम करणाऱ्यांना मानधन नसल्याने या कामाला वेगही येत नव्हता.
या सर्वांची गावसभेत निवड होणार असून इच्छुकांना अर्ज करावे लागणार आहेत. अर्ज न आल्यास ग्रामपंचायतीने असे काम करण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तीची निवड करायची आहे. यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी, जलसुरक्षक, ग्रामरोजगार सेवक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना इच्छेनुसार प्राधान्य देण्यात यावे. यांना संवाद टुल कीट, आय कार्ड, टी शर्ट, टोपी, शिट्टी, अॅप्रॅन आणि बॅटरी हे साहित्य देण्यात येणार आहे. या स्वच्छाग्रहींना नादुरुस्त शौचालय दुरुस्तीनंतर प्रतिशौचालय २५ रुपये, शोषखड्डा बांधण्यास प्रवृत्त करणे प्रतिकुटुंब ५० रुपये, सार्वजनिक शौचालयाची १५ दिवसांतून एकदा स्वच्छतेची खात्री करणे प्रतिशौचालय १०० रुपये, ग्रामपंचायत सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प बांधकाम झाल्यानंतर २ हजार रुपये अशा पद्धतीने ओला कचरा, सुका कचरा वर्गीकरण अशा बाबी पूर्ण झाल्यानंतर ही प्रोत्साहनपर रक्कम दिली जाणार आहे.