Kolhapur: न्यायालयाच्या जुन्या इमारतींना नवी झळाळी; सर्किट बेंचच्या उद्घाटनाची जोरदार तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 19:11 IST2025-08-05T19:09:53+5:302025-08-05T19:11:58+5:30
सुरक्षेसाठी विशेष खबरदारी

Kolhapur: न्यायालयाच्या जुन्या इमारतींना नवी झळाळी; सर्किट बेंचच्या उद्घाटनाची जोरदार तयारी
कोल्हापूर : सर्किट बेंचचे उद्घाटन होण्यासाठी अवघा दोन आठवड्यांचा कालावधी उरल्याने सीपीआरसमोरील न्यायालयाच्या जुन्या इमारतींची डागडुजी आणि रंगरंगोटी करण्याचे काम गतीने सुरू आहे. अंतरबाह्य दुरुस्ती आणि रंगरंगोटीमुळे जुन्या इमारतीचा चेहरामोहरा बदलत आहे. हेरिटेज इमारत आणखी आकर्षक बनत आहेत, तर सर्वच इमारतींना नवी झळाळी येत आहे.
कोल्हापुरातील न्यायिक परंपरेला सुमारे पावणे दोनशे वर्षांची परंपरा आहे. यातील बहुतांश काळ न्यायदानाचे काम सीपीआरसमोरील जुन्या इमारतींमधून चालले. इतिहासाचा साक्षीदार असलेल्या या इमारती आता पुन्हा सर्किट बेंचसाठी सज्ज होत आहेत. सर्वच इमारतींचे फायर ऑडिट केले असून, सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे.
वाचा: सर्किट बेंचचे उद्घाटन आता १६ ऐवजी १७ ऑगस्टला, ठिकाणही बदलण्याची शक्यता
भूमिगत विद्युत केबल टाकण्याचे काम पूर्ण झाले. जीर्ण झालेले दरवाजा, खिडक्या, छताचा भाग काढून दुरुस्ती केली जात आहे. आतील लाकडी बनावटीचे साहित्य पॉलिश केल्याने आणखी आकर्षक बनत आहे. विद्युतपुरवठा, जनरेटर, पाणी पुरविण्याची कामे अंतिम टप्प्यात आहेत. साफसफाई आणि रंगकामामुळे इमारतींचा चेहरामोहरा बदलत आहे.
सर्व इमारतींचा वापर
चार मजली इमारतीत चार बेंचची व्यवस्था केली जात आहे. कौटुंबिक न्यायालयाच्या जुन्या इमारतीत डिव्हिजन बेंचची व्यवस्था असेल. राधाबाई बिल्डिंगमध्ये रेकॉर्डरूम असेल. प्रवेशद्वाराजवळ असलेल्या इमारतीमधून प्रशासकीय कामकाज चालेल, अशी प्राथमिक माहिती ठेकेदारांकडून मिळाली.
वाचा: सर्किट बेंच सुरक्षेसाठी न्यायालयाच्या दारात स्वतंत्र पोलिस चौकीचा प्रस्ताव
निवासस्थानांसाठी पोलिसांकडे मागणी
सर्किट बेंचमधील कर्मचाऱ्यांसाठी जुना बुधवार पेठेतील पोलिसांच्या गृह प्रकल्पातील ३० फ्लॅटची मागणी करण्यात आली आहे. मात्र, पोलिस प्रशासनाकडून अजून याला हिरवा कंदील मिळालेला नाही. न्यायमूर्तींसाठी प्रतिभानगर येथील एका इमारतीमधील सर्व फ्लॅट बुक केले आहेत.