बदलापूरच्या घटनेवरून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नीलम गोऱ्हे संतापल्या, कोल्हापूरहून तातडीने मुंबईला रवाना
By समीर देशपांडे | Updated: August 20, 2024 15:28 IST2024-08-20T15:26:46+5:302024-08-20T15:28:36+5:30
'आपलं ते बाब्या आणि दुसऱ्याच ते कार्ट' अशा पद्धतीचे राजकारण महिलांच्या प्रश्नात आणू नये'

बदलापूरच्या घटनेवरून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नीलम गोऱ्हे संतापल्या, कोल्हापूरहून तातडीने मुंबईला रवाना
कोल्हापूर: बदलापूरच्या घटनेवरून विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पोलिसांच्या कार्यपध्दतीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्या कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होत्या. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोऱ्हे यांना तातडीने बदलापूरला पोहोचायला सांगितल्याने त्या खास विमानाने येथील काही कार्यक्रम रद्द करून रवाना झाल्या आहेत.
नीलम गोऱ्हे म्हणाल्या, पालकांनी आणि नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये. कायद्याच्या चौकटीत राहूनच लवकरात लवकर गुन्हेगारांना कशी शिक्षा देता येईल हे पाहणे महत्त्वाचे असते. संबंधित खटला जलद गतीने फास्ट कोर्टात चालवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील राहील. संबंधित संशयित गुन्हेगारांना फाशी लवकरात लवकर कशी देता येईल यासाठी प्रयत्न केला जाईल. महिला पोलीस अधिकारी असून या घटनेचा गुन्हा नोंद करायला उशिर का लागला? असा सवाल गोऱ्हे यांनी यावेळी केला.
बदलापूर येथे पोहचून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेणार असून त्याचा अहवाल लवकरात लवकर राज्य सरकारला सुपूर्द करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपलं ते बाब्या आणि दुसऱ्याच ते कार्ट अशा पद्धतीचे राजकारण महिलांच्या प्रश्नात आणू नये असेही त्या म्हणाल्या.