चिमुकल्या जुनैनाच्या जगण्यासाठी दातृत्वाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 19:12 IST2020-03-12T19:11:14+5:302020-03-12T19:12:08+5:30
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हे आॅपरेशन होणार असून, त्यासाठी १६ लाख रुपये खर्च येणार आहे. या चिमुकलीला वाचवण्यासाठी कोल्हापूरकरांच्या दातृत्वाची गरज आहे.

चिमुकल्या जुनैनाच्या जगण्यासाठी दातृत्वाची गरज
इंदुमती गणेश ।
कोल्हापूर : जुनैना अवघ्या सात महिन्यांची असताना जुलाब लागले, कमी होईना म्हणून काही तपासण्या झाल्या आणि थॅलेसेमियाचे निदान झाले. आता ती तीन वर्षांची असून, बोन मॅरो ट्रान्स्प्लान्ट झाले तर पूर्णत: बरी होणार आहे. लाडक्या बहिणीला वाचवण्यासाठी पाच वर्षांची रिजवानाच दाता झाली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हे आॅपरेशन होणार असून, त्यासाठी १६ लाख रुपये खर्च येणार आहे. या चिमुकलीला वाचवण्यासाठी कोल्हापूरकरांच्या दातृत्वाची गरज आहे.
पोस्टल कॉलनी, पाचगाव येथील जावेद नदाफ हे रिक्षाचालक असून, ते विद्यार्थी वाहतूक करतात. पती-पत्नी आणि दोन मुली असे हे कुटुंब. मोठी रिजवाना पाच वर्षांची, तर जुनैना तीन वर्षांची आहे. जुनैनाला थॅलेसेमिया असून या आजारात नवीन रक्त तयार होत नाही, त्यामुळे ते दर महिन्याला चढवावे लागते. तेव्हापासून तिला रक्त चढवण्यासह औषधोपचार सुरू आहे. योग्य काळजी घेतल्याने आता ती आॅपरेशन सहन करू शकेल इतकी सक्षम झाली आहे. हे आॅपरेशन कोल्हापूर, मुंबई किंवा पुण्यातही होत नाही. त्यामुळे सध्या तिच्यावर बंगलोर येथील अॅस्टर सीएमआय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. जुनैनाला जगवण्यासाठी बोन मॅरो ट्रान्स्प्लान्ट करावे लागणार आहे.
सर्व तपासणीअंती रिजवानाचे बोन मॅरो जुनैनाला योग्यरितीने मॅच होत असल्याचे सिद्ध झाले. आपल्या लाडक्या लहान बहिणीसाठी ती दाता झाली आहे. या उपचारासाठी तिला ६ महिने दवाखान्यात राहावे लागणार असून, त्यासाठी तब्बल १६ लाख रुपये खर्च येणार आहे. जावेद यांची आर्थिक स्थिती हलाखीची असून, ते लेकीला वाचवण्यासाठी राजकीय नेत्यांपासून ते विविध ट्रस्टकडे तिची फाईल घेऊन फिरत आहेत. तरीही आठ ते नऊ लाख रुपये कमी पडत आहेत.
वडिलांचे आवाहन
दानशूरांनी शक्य तितकी मदत करावी, असे आवाहन वडील जावेद नदाफ यांनी केले आहे. तुम्ही शंभर रुपयांपासून देखील मदत करू शकता.
आयडीबीआय खाते :- ६१५१००१०००५३०१
आयएफसी कोड : -कइङछ0000६१५
गुगल पे, पे टीएमने सुद्धा पैसे पाठवू
संपर्क : ७३८५५४८९६४, ८४२१९२१९६४
पत्ता : प्लॉट नंबर ०३, हरी पार्क, पोस्टल कॉलनी, आर. के. नगर रोड पाचगाव