Sambhaji Raje: संभाजीराजेंना राष्ट्रवादीचा पाठिंबा, पवारांची राजकीय खेळी की सहानुभूती?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 11:18 AM2022-05-16T11:18:16+5:302022-05-16T11:18:49+5:30

ज्येष्ठ नेते शरद पवार व छत्रपती घराणे यांचे फार जुने संबंध आहेत. या घराण्याविषयी पवार यांच्या मनात कमालीचा आदर आहे.

NCP supports former MP Sambhaji Raje Rajya Sabha candidature | Sambhaji Raje: संभाजीराजेंना राष्ट्रवादीचा पाठिंबा, पवारांची राजकीय खेळी की सहानुभूती?

Sambhaji Raje: संभाजीराजेंना राष्ट्रवादीचा पाठिंबा, पवारांची राजकीय खेळी की सहानुभूती?

googlenewsNext

कोल्हापूर : माजी खासदार संभाजीराजे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीला पाठबळ देण्याचा निर्णय घेतला. यामागे पवार यांचे छत्रपती घराण्यावरील प्रेम अधोरेखित होतेच, त्याचबरोबर महाराष्ट्रात सर्वप्रथम पाठिंबा देऊन जाहीर त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांची सहानुभूती मिळवण्याची खेळी त्यांनी खेळली आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार व छत्रपती घराणे यांचे फार जुने संबंध आहेत. या घराण्याविषयी पवार यांच्या मनात कमालीचा आदर आहे. त्यातूनच त्यांनी २००४ ला मालोजीराजे यांना ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधून कॉंग्रेसमध्ये पाठवून आमदार केले. २००९च्या लोकसभेला रथी-महारथी राष्ट्रवादीकडे उमेदवारीसाठी प्रयत्नशील असताना त्यांनी संभाजीराजे यांना उमेदवारी देऊन अनेकांना धक्का दिला. या पराभवापासून संभाजीराजे राष्ट्रवादीपासून बाजूला गेले आणि त्यांनी महाराष्ट्रात आपली स्वतंत्र ताकद वाढवली. त्याचे फलित म्हणून भाजपने राष्ट्रपती कोट्यातून त्यांना राज्यसभेवर पाठवले.

राज्यसभेची मुदत संपल्यानंतर संभाजीराजे यांनी स्वत:ची ‘स्वराज्य’ संघटनेबरोबरच राज्यसभा अपक्ष लढण्याची घोषणा केली. राज्यातील सर्वपक्षीयांना आपल्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले होते. त्याला पहिल्यांदा प्रतिसाद ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देत त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवला. यामागे छत्रपती घराण्यावरील प्रेम आहेच, त्याचबरोबर मराठा आरक्षण व विविध मागण्यांसाठी संभाजीराजे यांनी मुंबईत आझाद मैदानात उपोषण सुरू केले होते.

या उपोषणाने राज्य सरकार अडचणीत सापडणार म्हटल्यावर शरद पवार यांनी मध्यस्थी केली, त्यांचा शब्द मानून संभाजीराजेंनी उपोषण मागे घेतले. त्यामुळेच संभाजीराजे यांचे सरकारला सहकार्य असल्याचे जाहीर वक्तव्य पवार यांनी केले होते. त्याचबरोबर गेल्या दहा वर्षात संभाजीराजे यांची महाराष्ट्रात ताकद वाढली असून, त्या ताकदीचा उपयोग आघाडी करून घेण्याची खेळीही असू शकते.

पवार यांचे प्रेम आणि टीकाही

शरद पवार हे छत्रपती घराण्यावर पहिल्यापासूनच प्रेम करतात. मात्र भाजपच्या कोट्यातून त्यांनी राज्यसभा घेतल्यानंतर, ‘पूर्वी छत्रपती पेशवांची नेमणूक करायचे आता पेशवे छत्रपतींची नेमणूक करत आहेत’, अशी बोचरी टीका त्यांनी केली होती.

संभाजीराजेंचे गणित असे जुळू शकते

राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. प्रत्येकाला विजयासाठी ४१ मतांचा कोटा हवा आहे, महाविकास आघाडीकडे १६९ आमदारांचे पाठबळ आहे. त्यामुळे शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादीचा प्रत्येक एक असे तीन व चौथ्या जागेसाठी आघाडी संभाजीराजेंना पाठिंबा देऊ शकतात. आघाडीकडील राहिलेल्या मतांच्या ताकदीवर ते सहज विजयी होऊ शकतात.

Web Title: NCP supports former MP Sambhaji Raje Rajya Sabha candidature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.