'महादेवी'साठी रविवारी नांदणी ते कोल्हापूर आत्मक्लेश पदयात्रा, राजू शेट्टी यांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 14:32 IST2025-08-01T14:32:04+5:302025-08-01T14:32:54+5:30
नांदणी मठानंतर आता सीमाभागातील शेडशाळ मठाला हत्ती देण्यासंबंधी पत्र गेले

'महादेवी'साठी रविवारी नांदणी ते कोल्हापूर आत्मक्लेश पदयात्रा, राजू शेट्टी यांनी दिली माहिती
कोल्हापूर : वनतारातून महादेवी हत्तीण परत आणण्यासाठी एक रविवार महादेवी हत्तीणसाठी अशी मोहीम राबवून सामाजिक दबाब निर्माण करण्यात येणार आहे. रविवारी दि.३ ऑगस्टला पहाटे चार वाजता नांदणी मठ ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय अशी ४५ किलोमीटरची आत्मक्लेश मूक पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती माजी खासदार, स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी दिली.
शेट्टी म्हणाले, शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील मठातील महादेवी हत्तीणीला वनताराकडे सुपूर्द करण्यात आल्यानंतर प्रचंड जनआक्रोश निर्माण झाला आहे. पेटाच्या सुपारीमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील देवस्थान आणि मठातील सर्व हत्ती वनताराला नेण्यात येणार आहेत.
वाचा: वनताराची टीम नांदणीला भेट देणार, हत्तीणीसाठी सर्वपक्षीय नेते धावले मठाकडे
नांदणी मठानंतर आता सीमाभागातील शेडशाळ मठाला हत्ती देण्यासंबंधी पत्र गेले आहे. अशाप्रकारे पेटाची दादागिरी, अंबानींसाठीची केंद्र सरकारची भूमिका याविरोधात भावना असलेले सर्व धर्म, पक्ष पदयात्रेत सहभागी होणार आहेत. यामध्ये ‘महादेवी हत्तीणीला परत आणणार’ हा एकच फलक असेल.
ज्या नांदणी मठातून महादेवीला शेवटचा निरोप देण्यात आला, तेथूनच रविवारी पहाटे चार वाजता पदयात्रेला सुरुवात होईल. ही पदयात्रा सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर येईल. येथे राष्ट्रपती यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पदयात्रेची सांगता होईल.