Kolhapur Municipal Corporation Election: मतदार यादीचा घोळ संपेना!, कोल्हापुरातील सहाजणांची नावे थेट बार्शी, खडकवासलात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 18:47 IST2025-12-04T18:46:39+5:302025-12-04T18:47:30+5:30
यादी दुरुस्त झाली नाही तर या मतदारांना मतदानापासून वंचित रहावे लागणार

Kolhapur Municipal Corporation Election: मतदार यादीचा घोळ संपेना!, कोल्हापुरातील सहाजणांची नावे थेट बार्शी, खडकवासलात
कोल्हापूर : एक प्रभागातील नावे दुसऱ्या प्रभागातील मतदार यादीत समाविष्ट झाल्याच्या अनेक तक्रारी महापालिका प्रशासनाकडे प्राप्त झाल्या असताना आता सहा विचित्र तक्रारी दाखल झाल्याने प्रशासनही गडबडून गेले आहे. प्रभाग क्रमांक १२ मधील पाच नावे बार्शी येथील तर एक नाव खडकवासला येथील यादीत गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यादी दुरुस्त झाली नाही तर या मतदारांना मतदानापासून वंचित रहावे लागणार आहे.
आसिया अलिम बारगीर रा. बाराईमाम, बिलकश शब्बीर बागवान रा. बिंदू चौक, आयेशा गुलाम साबिर मोमीन रा. हुजुर गल्ली, महेक यासीन म्हालदार रा. बाराईमाम हसीना मुबारक मोमीन रा. हुजुर गल्ली या पाच मतदारांची नावे कोल्हापुरातील यादीतून कमी होऊन ती बार्शी जि. सोलापूर येथील यादीत समाविष्ट झाली आहेत. जेबा दस्तगीर मुल्ला रा, स्वरुप पार्क, कसबा बावडा यांचे नाव पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदार यादीत समाविष्ट झाले आहे. महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १२ ची यादी तपासताना ही बाब समोर आली. जेंव्हा आपली नावे मतदार यादीत नसल्याचे लक्षात येताच या मतदारांना धक्का बसला.
याबाबत मतदारांनी निवडणूक कार्यालयाकडे तक्रार केली असली तरी त्यांना ठोस उत्तर मिळत नाही. निवडणूक आयोगाशी संपर्क साधून मार्गदर्शन घेतले जात असल्याचे अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे मतदार हवालदिल झाले आहेत. गेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात मतदान केल्यानंतरही आता महापालिका निवडणुकीत त्यांच्या मतदानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याबाबत माजी नगरसेवक आदिल फरास यांनी सांगितले की, आम्ही याद्या तपासल्या म्हणून ही चूक लक्षात आली. अशी अनेक नावे केवळ दुसऱ्या प्रभागातच नाहीत तर अन्य जिल्ह्यात गेली असण्याची शक्यता आहे. अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले आहेत. बीएलओ प्रभागात फिरत नाहीत तर अधिकारी तक्रारीकडेच कानाडोळा करत आहेत.
तर न्यायालयात जाणार
प्रभाग क्रमांक १२ मध्ये सुमारे तीन हजार नावे ही अन्य प्रभागातील आहेत. ती रद्द करावीत, अशी मागणी करण्यात आल्याचे आदील फरास यांनी सांगितले. मतदारांच्या तक्रारींवर योग्य पद्धतीने शहनिशा करून मतदार याद्या दुरुस्त केल्या नाहीत तर मात्र आम्हाला न्यायालयात दाद मागावी लागेल, असा इशारा फरास यांनी यावेळी दिला.