नाव हायब्रिड... पण काम कासवगतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:02 IST2021-02-05T07:02:41+5:302021-02-05T07:02:41+5:30
संजय पारकर / लोकमत न्यूज नेटवर्क / राधानगरी : हायब्रिड-अॅन्युइटी योजनेतून होत असलेल्या निपाणी-दाजीपूर या आंतरराज्य रस्त्याच्या कामाची ...

नाव हायब्रिड... पण काम कासवगतीने
संजय पारकर / लोकमत न्यूज नेटवर्क / राधानगरी :
हायब्रिड-अॅन्युइटी योजनेतून होत असलेल्या निपाणी-दाजीपूर या आंतरराज्य रस्त्याच्या कामाची दोन वर्षांची मुदत संपली तरीही अजून अर्धेही काम झालेले नाही. वेळेत काम होत नसल्याने ठेकेदाराला दररोज सव्वा लाख रुपये दंड आकाराला जात आहे. यापोटी बिलातून दीड कोटीची वसुली करण्यात आली आहे. तरीही या कामाला आवश्यक गती मिळत नाही. कामाला कोरोनामुळे काही महिने मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.
७० किलोमीटर अंतराचे हे काम पुण्यातील जितेंद्रसिह कंपनीला मिळाले आहे. डिसेंबर २०१८ मध्ये त्याची सुरुवात झाली. मात्र सुरुवातीपासूनच काम कासवगतीने सुरू आहे. दोन वर्षांत जेमतेम ५० टक्के काम झाले आहे. याच योजनेतील कोल्हापूर-परिते-मुदाळ हे ५० कि.मी.चे कामही या कंपनीकडे आहे. मोठे काम असले तरी त्यासाठी आवश्यक यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे रस्त्यांची व मोऱ्यांची जागोजागी केलेली खुदाई व त्यामुळे वाहतुकीची कोंडी, वाहनधारकांचे सुरू असलेले हाल असे चित्र या दोन्ही मार्गांवर सर्वत्र आहे.
नागरिकांच्या तक्रारीनंतर आमदार प्रकाश आबिटकर यांनी दोन महिन्यांपूर्वी पाहणी करून आढावा घेतला होता. त्यांनी ठेकेदार बदलण्याची मागणी केली होती. त्यामुळे याच्या चौकशीसाठी नाशिक विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोल्हापूर-मुदाळ या मार्गाच्या कामाला उशिरा सुरुवात झाल्याने हे काम या कंपनीकडून काढून घेण्याचा प्रस्ताव तयार झाला आहे.
चौकट- भाजपचे सरकार केंद्रात सत्तेवर आल्यावर २०१४ मध्ये ही नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. ६० टक्के रक्कम शासन देणार व ४० टक्के रक्कम ठेकेदाराने गुंतवायची. शासन ही रक्कम पुढे दहा वर्षांत देणार असे याचे स्वरूप आहे. त्या काळी नवीनच योजना असल्याने ठेकेदारांचा प्रतिसाद नव्हता. सिंधुदुर्ग विभागातील याच रस्त्याचे काम त्यामुळे रद्द झाले आहे. २०१४ च्या अंदाजपत्रकाप्रमाणे काम करावे लागणार असल्याने ठेकेदारही आतबट्ट्यात जाणार आहे. त्यामुळे जुना ठेका रद्द केला तरी नवीन ठेकेदार मिळणे अशक्य आहे.
फोटो ओळ- निपाणी-दाजीपूर रस्त्याचे काम कासवगतीने सुरू असल्याने राधानगरी बाजारपेठेत रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. येथील तहसीलदार कार्यालयासमोर गटारीचे पाणी असे रस्त्यातून वाहते.