नागपंचमी विशेष: अकरावेळा सापाने घेतला चावा, तरीही मैत्री नाही तुटली; कोल्हापुरातील दिनकर चौगुलेंनी २० हजार सापांना दिलं जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 19:01 IST2025-07-29T19:00:52+5:302025-07-29T19:01:40+5:30

१०० हून अधिक सर्पमित्र घडविले..

Nag Panchami Special Dinkar Chougule from Kolhapur saved the lives of 20,000 snakes | नागपंचमी विशेष: अकरावेळा सापाने घेतला चावा, तरीही मैत्री नाही तुटली; कोल्हापुरातील दिनकर चौगुलेंनी २० हजार सापांना दिलं जीवदान

नागपंचमी विशेष: अकरावेळा सापाने घेतला चावा, तरीही मैत्री नाही तुटली; कोल्हापुरातील दिनकर चौगुलेंनी २० हजार सापांना दिलं जीवदान

सरदार चौगुले

पोर्ले तर्फ ठाणे : समाजमाध्यमांवर प्रसिद्धी मिळवण्यासाठी विषारी प्राण्यांबरोबर खेळणं सर्पमित्रांच्या जीवावर बेतत असताना पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथील सर्पमित्र दिनकर कृष्णा चौगुले यांना ११ वेळा सर्पदंश हाेऊनही ४७ वर्षे सापांना पकडून अधिवासात सोडण्याची सेवा आजही सुरूच ठेवली आहे. त्यांनी जिल्ह्यात १०० हून अधिक सर्पमित्रांना तयार केले आहे तर २० हजारहून अधिक सापांना जीवनदान दिले आहे.

७० च्या दशकात पोर्ले येथे एक व्यक्ती सापांच्या शेपटीला धरून दगडावर आपटून मारतानाचे पाहून दिनकर यांना वाईट वाटले. वयाच्या १७ व्या वर्षी शेतात उसाचा पाला काढताना सापाच्या डोक्यावर पाय ठेवून शेपटीला पकडलेला साप बाजूच्या शेतात भिरकावला. दरम्यान, बत्तीस शिराळा येथे सापाच्या डोक्यावर काठी ठेवून सापाला पकडले जात असल्याचे माहितीवरून त्यांनी सापांना पकडायला सुरुवात केली. १९७९ मध्ये पहिल्यांदा घोणस तर त्यानंतर दहावेळा नागाचा सर्पदंश झाला. त्यांनी वेळेत उपचार घेतल्याने जीवावर बेतले नाही. विरूळासारख्या बिनविषारी सापापासून अजगरासारखे भले मोठे साप पकडून अधिवासात सोडले आहेत.

सापाबद्दल त्यांच्याकडे अगाध ज्ञान आहे. दिनकराव आणि साप असे एक समीकरण बनले आहे. साप चावला की तो विषारी आहे बिनविषारी ते दंश बघून सांगतात. सर्पदंश होऊन जीवावर बेतलेल्या अनेक सर्पमित्र असो शेतकरी त्यांना आधार देऊन वाचविण्याची काम ते आजही करतात. सापाबद्दल लोकाच्या मनात असणारे अनेक गैरसमज दूर करण्यासाठी त्यांची प्रबोधनात्मक चळवळ सुरू आहे.

सापाबरोबर बिबट्याही..

दिनकरावांनी पन्हाळ्याच्या डोंगरात दोन बिबट्यांना सापळे लावून पकडले होते. तीन दरवाजाजवळील गुढे गावात महिलेला जखमी करून नरभक्षक बनलेल्या बिबट्याला १९८५ मध्ये पकडले होते. घुंघूर बांदिवडे येथील शाळकरी मुलावर बिबट्याने हल्ला केला होता. त्या बिबट्यालासुद्धअ त्यांनी पकडून दाजीपूरच्या अरण्यात सोडले होते.

१०० हून अधिक सर्पमित्र घडविले..

१९८३ ला दिलीप कामत या सर्पमित्राने त्यांना पुण्यात साप पकडण्याचे प्रशिक्षण दिले. त्यानंतर त्यांनी १०० हून अधिक सर्पमित्र तयार केले आहेत. शिवाय एखादा सर्पमित्र आणि शेतकऱ्याला सर्पदंशामुळे जीवावर बेतत असेल तर त्याला वाचविण्यासाठी ते धावून जातात. १९८१ मध्ये पोर्लेत एका खोलीत सर्पालय सुरू केले. या परिसरात अज्ञानपणामुळे बळी जाणाऱ्या सापांना पकडून संगोपन करून, त्यांना वनक्षेत्रात सोडण्याचा त्यांचा उपक्रम आजही सुरू आहे.

साप हा प्राणी विषारी आहे, हे माहीत असतानासुद्धा काही सर्पमित्र त्याच्याबरोबर खेळ करून जीव गमावत आहेत. साप पकडताना स्टंटबाजी करू नका. साप पकडताना स्टिकचा वापर करणे आणि साप चावला तर वेळेत उपचार घेणे गरजेचे आहे. - दिनकर चौगुले, सर्पमित्र पोर्ले तर्फ ठाणे

Web Title: Nag Panchami Special Dinkar Chougule from Kolhapur saved the lives of 20,000 snakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.