तीन जागांची ऑफर मुश्रीफ, सतेज पाटील यांनी फेटाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 18:28 IST2021-03-16T18:26:22+5:302021-03-16T18:28:27+5:30
Gokul Milk Kolhapur-गोकुळच्या निवडणुकीत सत्तारूढ गटाने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी तीन जागांची केलेली ऑफरच एकसंध होण्याच्या चर्चेला पूर्णविराम देणारी ठरली आहे. मंत्री पाटील यांच्या गटाकडून सोमवारी संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या तर आपल्या हिमतीवर लढण्याची भूमिका घ्यावी, असा आग्रह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून झाल्याने गोकुळच्या मैदानात पी. एन.-महाडीक व मुश्रीफ-सतेज पाटील असाच सामना होणार, हे निश्चित झाले.

तीन जागांची ऑफर मुश्रीफ, सतेज पाटील यांनी फेटाळली
कोल्हापूर : गोकुळच्या निवडणुकीत सत्तारूढ गटाने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी तीन जागांची केलेली ऑफरच एकसंध होण्याच्या चर्चेला पूर्णविराम देणारी ठरली आहे. मंत्री पाटील यांच्या गटाकडून सोमवारी संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या तर आपल्या हिमतीवर लढण्याची भूमिका घ्यावी, असा आग्रह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून झाल्याने गोकुळच्या मैदानात पी. एन.-महाडीक व मुश्रीफ-सतेज पाटील असाच सामना होणार, हे निश्चित झाले.
गोकुळमध्ये मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील व महादेवराव महाडीक यांनी एकत्रित यावे, यासाठी काहींचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातूनच मंत्री मुश्रीफ, मंत्री पाटील व आमदार पाटील यांची मुंबईत बैठक झाली. त्यानंतर रविवारी जिल्हा बँकेत मंत्री मुश्रीफ व आमदार पाटील यांची बैठक झाली.
यामध्ये जागांवर चर्चा होऊन राष्ट्रवादीला दोन तर मंत्री पाटील यांना एक जागा देण्याचा प्रस्ताव पुढे आला. यावरून मंत्री पाटील यांच्या गटात सोमवारी संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. मागील निवडणुकीत मंत्री पाटील यांनी अठरा जागा लढवून त्यातील दोन जागा जिंकल्या होत्या. त्यात गेली पाच वर्षे त्यांनी निवडणुकीची मोर्चेबांधणी केल्याने ते सुरुवातीपासूनच तडजोडीला तयार नाहीत.
मंत्री मुश्रीफ यांनी मागील निवडणुकीत एक जागा घेऊन सत्तारूढ गटाला साथ दिल्याने राष्ट्रवादीचे पदाधिकारी नाराज होते. पुन्हा दोन जागा घेऊन तडजोड केली तर पक्षामध्ये असंतोष निर्माण होईल, यापेक्षा स्वत:च्या हिमतीवरच लढवण्याची मानसिकता मंत्री मुश्रीफ यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची दिसते.
मनपाचे कर प्रकरण चर्चेतील अडथळा
महापालिकेच्या कर आकारणीवरून पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर कदम बंधूने केलेले आरोप, त्यामध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनाही ओढले. हेच गोकुळच्या तडजोडीतील अडथळा ठरल्याची चर्चा सुरू आहे.
मी नाही, तुम्ही निर्णय घ्या....
सत्तारूढ गटाने दिलेल्या ऑफरवर पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रतिसाद दिला नसला तरी त्यांनी मी नाही, तुम्ही निर्णय घ्या, असा निरोप मंत्री मुश्रीफ यांना दिल्याचे समजते.