गुडघाभर मातीच्या बांधात मुरवले सात लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2015 01:01 IST2015-04-21T00:53:49+5:302015-04-21T01:01:39+5:30

‘आंधळं दळतंय...’चा अनुभव : पणुत्रे पाणी योजना गैरव्यवहार

Murlav in the clay bundle of seven lakhs | गुडघाभर मातीच्या बांधात मुरवले सात लाख

गुडघाभर मातीच्या बांधात मुरवले सात लाख

विश्वास पाटील-कोल्हापूर ट्रेंच गॅलरीची दुरुस्ती करताना नदीतील पाणी कामाच्या ठिकाणी येऊ नये म्हणून घातलेल्या गुडघाभर वाळू-मातीच्या बंधाऱ्यावर तब्बल सात लाख रुपये खर्च केले आहेत. अधिकाऱ्यांनीही डोळ््यांवर पट्टी बांधून ठेकेदारास बिल अदा केले आहे. ‘आंधळे दळते व कुत्रे पीठ खाते..’ असाच हा प्रकार आहे.
गेल्या आॅक्टोबरमध्ये नदीला पाणी नव्हते तेव्हा ट्रेंच गॅलरीचे काम झाले. नदीतील वाहत्या पाण्यामुळे कामात व्यत्यय येऊ नये म्हणून वाळू-मातीचा बांध घालून पाणी एका बाजूने सोडले होते. हा बांध गुडघाभर म्हणजेच दोन-तीन फुटांचाच होता. मोजमाप वहीत त्याची उंची सहा, नऊ व बारा फूट दाखवली आहे, असा सुमारे ७८ मीटर लांबीचा बांध घातल्याचे दाखवून त्यावर सात लाख रुपये खर्च टाकले आहेत. धामणी नदीवर शेतकरी उन्हाळयात पाणी अडविण्यासाठी मातीचे बंधारे घालतात. त्यासाठी सरासरी सव्वा लाख रुपये खर्च येतो आणि गुडघाभर बांधासाठी सात लाख रुपये खर्च कसा आला, त्याचे मोजमाप कुणाच्या व कोणत्या पट्टीने घेतले याची चौकशी होण्याची गरज आहे. या योजनेतील गैरव्यवहाराची तक्रार झाल्यावर कार्यकारी अभियंता एम. बी. भोई यांनी कामास स्थगिती दिली परंतु पुन्हा त्यांनीच ठेकेदारास बिल देण्याचीही शिफारस केली. त्यामुळे भोई यांनी ठेकेदारास गैरव्यवहाराची बक्षिसी दिली का, अशी विचारणा ग्रामस्थ करत आहेत.
भारत निर्माण योजनेतून २०१२ ला झालेल्या ट्रेंच गॅलरीचे काम ४ लाख ७१ हजार रुपयांत झाले असताना अवघ्या दोन वर्षांतच दुरुस्तीसाठी तब्बल १३ लाख ९५ हजार रुपयांची उधळपट्टी करून पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या अध्यक्ष, सचिव व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या डोळ््यांत धूळच फेकली आहे. जुनी ट्रेंच गॅलरी २० मीटर लांबीची होती. नवीन गॅलरीमध्ये जुन्याच पाईपचा वापर केला आहे. फक्त चार स्लॉटेड पाईप काढून त्याठिकाणी नवीन पाईप घातल्या आहेत. मात्र, मोजमाप वहीत १७.५ मीटरच्या वाढीव पाईप घातल्याचे दाखवून गॅलरीची लांबी वाढविल्याचे दर्शवले आहे. (उत्तरार्ध)


ट्रेंच गॅलरी म्हणजे काय..
ज्या गावांच्या योजना कमी किमतीच्या अथवा छोट्या असतात व जिथे स्वतंत्र फिल्टर हाऊसची तरतूद नसते, अशा योजनांमध्ये ‘ट्रेंच गॅलरी’ची सोय केली जाते. ट्रेंच म्हणजे थर. नदी अथवा ओढ्यातील पाणी योजना असते तिथे पाईपलाईन टाकून नदीतील पाणी पात्राशेजारी बांधलेल्या जॅकवेलमध्ये घेतले जाते. अशावेळी गढूळ पाणी जॅकवेलमध्ये येऊ नये यासाठी फिल्टरची व्यवस्था म्हणजे ट्रेंच गॅलरी. यामध्ये बाहेरच्या बाजूस वाळू, त्याच्या आत छोटी खडी व त्याच्या आत मोठ्या खडीचे थर असतात. त्यामुळे त्यातून पाणी झिरपून स्वच्छ होऊन स्लॉटेड (छिद्रे असलेली) पाईपमधून जॅकवेलमध्ये जाते परंतु पणुत्रे योजनेत मात्र उलटेच झाले आहे. तिथे या पाईप मातीने भरल्या आहेत आणि ट्रेंच गॅलरीत भ्रष्टाचाराचा पैसा मुरला आहे.

Web Title: Murlav in the clay bundle of seven lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.