मनपा कर्मचाऱ्यांची पासबुके खासगी सावकारांच्या गळाला

By Admin | Updated: July 6, 2014 00:12 IST2014-07-06T00:11:35+5:302014-07-06T00:12:46+5:30

फास सुटणार कधी ? : अठरा हजार पगार असूनही एक हजारासाठी होतेय गयावया; सफाई कामगारांच्या जीवनातील भयान वास्तव

Municipal employees' passbooks hit the private lenders | मनपा कर्मचाऱ्यांची पासबुके खासगी सावकारांच्या गळाला

मनपा कर्मचाऱ्यांची पासबुके खासगी सावकारांच्या गळाला

भारत चव्हाण ल्ल कोल्हापूर
सफाई कर्मचारी म्हणून नोकरी, प्रतिमहिना पगार पंधरा ते अठरा हजार, म्हटले तर नवरा-बायको आणि दोन मुलांचं घर कसं झक्कास चालायला पाहिजे. पण त्यांच्या नशिबी असलं सुख कदाचित नसावंच. काहीतरी गरजेपुढं खासगी सावकाराचं कर्ज घेतलं आणि ते फिटता फिटले नाही. त्यामुळे आणखी थोडी रक्कम हातउसनी घेतली. त्यामुळे कर्जाचा डोंगर आणखी वाढला तो वाढलाच.
काम करणार गरीब कर्मचारी आणि पगाराचे मालक मात्र झालेत गब्बर बनलेले सावकार! महिनाभर उन्हातान्हात कष्ट करणारे गरीब कर्मचारी चांगला पगार असूनही पगारातल्या एक-दोन हजारांसाठी सावकाराकडं गयावया करतायंत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील सुमारे ५०० हून अधिक कर्मचारी सावकारी पाशात अडकल्याचे हे भयावह चित्र आपणाला पगाराच्या दिवशी तीन बँकांच्या दारात पाहायला मिळते.
कोल्हापूर महानगरपालिकेतील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना पाच ते पंधरा टक्के व्याजदराने हजारो रुपये देणारे पाच ते सहा खासगी सावकार आहेत. सुरुवातीला गरज म्हणून दोन-पाच हजार व्याजाने दिले जातात. कर्मचाऱ्यांच्या गरजा वाढत जातात तसा नंतर हा आकडा वाढत राहतो. आता तर पाच हजारांपासून एक लाख रुपयांपर्यंत खासगी सावकाराची कर्ज झालीत. आता ती फेडायची कशी, या विवंचनेत असलेल्या कर्मचाऱ्यांनी सावकारांना थुक्का लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सावकारही सावध झाले. त्यांनी कर्जबाजारी झालेल्या कर्मचाऱ्यांची बँक पासबुकेच आपल्या ताब्यात घेतली आहेत. काहींच्या प्रॉव्हिडंट फंडाची पुस्तकेही घेतली गेली आहेत.
ज्या दिवशी कर्मचाऱ्यांचा पगार होणार आहे, त्याच दिवशी सावकार बँकेच्या दारात येऊन थांबतात. कर्मचाऱ्याला बँकेत जाताना त्याच्या हातात पासबुक देतात, पैसे काढून तो बाहेर आला की पासबुक आणि पगाराची सगळी रक्कम काढून घेतात. महिनाभर राबायचं आणि पगाराच्या दिवशी त्याचे मालक सावकार होतायंत. मग हक्काचा पगार दुसऱ्याच्या हातात पडल्यावर कर्मचारी व्याकुळ होऊन एक-दोन हजार तरी द्या, म्हणून गयावया करतात. गेल्या अनेक वर्षांपासून हे कर्मचारी सावकाराच्या विळख्यात सापडले आहेत. परंतु कोणताही कायदा त्यांना यापासून वाचवू शकलेला नाही.

Web Title: Municipal employees' passbooks hit the private lenders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.