मनपा निवडणुकीने उत्तर कर्नाटकात भाजपला बळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 06:45 IST2021-09-08T06:45:12+5:302021-09-08T06:45:34+5:30

हुबळी-धारवाड, कलबुर्गी त्रिशंकू; पण सत्ता स्थापणार : एमआयएमचा उदय कॉंग्रेससाठी चिंतेचा विषय

Municipal elections give strength to BJP in North Karnataka pdc | मनपा निवडणुकीने उत्तर कर्नाटकात भाजपला बळ

मनपा निवडणुकीने उत्तर कर्नाटकात भाजपला बळ

ठळक मुद्देबेळगाव महापालिका हा आजपर्यंत मराठी भाषिकांचा बालेकिल्ला मानला जात होता.  त्यात भाजपने ५८ पैकी ३५ जागा जिंकून निर्विवाद सत्ता हस्तगत केली.

चंद्रकांत कित्तुरे

कोल्हापूर : उत्तर कर्नाटकातील बेळगाव, हुबळी-धारवाड आणि कलबुर्गी या तीन महानगरपालिका निवडणुकीत मतदारांनी भाजपला बळ दिले आहे. बेळगावमध्ये प्रथमच स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर अन्य दोन महापालिकांमध्ये त्रिशंकू सभागृह अस्तित्वात आले असले तरी तेथे भाजपच सत्ता स्थापन करणार हे जवळजवळ स्पष्ट आहे. काॅंग्रेससाठी मात्र हा धक्का मानला जात आहे.

बेळगाव महापालिका हा आजपर्यंत मराठी भाषिकांचा बालेकिल्ला मानला जात होता.  त्यात भाजपने ५८ पैकी ३५ जागा जिंकून निर्विवाद सत्ता हस्तगत
केली.  कॉंग्रेसला १०, महाराष्ट्र एकीकरण समितीला ४, अपक्षांना ८ आणि एमआयएमला १ जागा मिळाली. महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी हा फार मोठा धक्का आहे. मराठी मतांची पक्षीय राजकारणात झालेली विभागणी,  मराठी उमेदवारांची संख्या जादा असणे ही या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पराभवाची काही प्रमुख कारणे आहेत. 

हुबळी-धारवाड महापालिकेच्या ८२ सदस्यीय महापालिकेत भाजपला ३९, कॉंग्रेसला ३३, एमआयएमला ३, संयुक्त जनता दलाला १ आणि अपक्षांना ६ जागा मिळाल्या आहेत. येथे त्रिशंकू सभागृह अस्तित्वात आले असले तरी सर्वांत मोठा पक्ष असलेला भाजप तेथे सत्ता स्थापन करणार आहे. कॉंग्रेसची सदस्यसंख्याही ११ ने वाढली आहे. ही बाब आगामी काळात चिंता वाढवणारी ठरू शकते. याचवेळी एमआयमने तीन जागा जिंकत प्रथमच सभागृहात प्रवेश केला आहे. एमआयएममुळे कॉंग्रेसची मते कमी झाली आहेत.

गुलबर्ग्यात काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष

n    कलबुर्गी म्हणजेच पूर्वीच्या गुलबर्गा महापालिकेत ५५ पैकी २७ जागा जिंकून कॉंग्रेस सर्वांत मोठा पक्ष बनला आहे. भाजपचे २३, संयुक्त जनता दलाचे ४ नगरसेवक निवडून आले आहेत. तर एक जागा अपक्षाला मिळाली. 
n    त्याने लगेच आपला पाठिंबा भाजपला जाहीर केला आहे. संयुक्त जनता दलही सत्तेसाठी भाजपशी हातमिळवणी करणार आहे.

n    मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही कलबुर्गीत सत्ता स्थापन करण्याचे संकेत मंगळवारी दिले आहेत.
n    विशेष म्हणजे बसवराज बोम्मई मुख्यमंत्रिपदी आल्यानंतर राज्यातल्या या पहिल्याच मोठ्या निवडणुका होत्या. त्यामुळे बोम्मई यांच्यासाठीही एक परीक्षाच होती आणि त्यात ते उत्तीर्ण झाले आहेत.
 

Web Title: Municipal elections give strength to BJP in North Karnataka pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.