कोल्हापुरातील संभाजीनगर बसपोर्टला मनपाची एनओसी, उद्घाटनाला मुहूर्त कधी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 11:52 IST2025-04-29T11:51:51+5:302025-04-29T11:52:15+5:30
वर्षभर एनओसीसाठी हेलपाटे, प्रवाशांना प्रतीक्षा

कोल्हापुरातील संभाजीनगर बसपोर्टला मनपाची एनओसी, उद्घाटनाला मुहूर्त कधी?
सचिन यादव
कोल्हापूर : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील एक महत्त्वाचे बसस्थानक म्हणून संभाजीनगर बसस्थानक आहे. या बसपोर्टचे मेकओव्हरचे काम पूर्ण झाले आहे. गेले वर्षभर विभागीय कार्यालय इमारत भोगवटा प्रमाणपत्र दाखल्यासाठी (एनओसी) प्रयत्न करत होते. हा दाखला २५ एप्रिल (शुक्रवारी) मिळाला आहे. त्यामुळे सर्व सुविधांनी सज्ज झालेले हे बसस्थानक उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.
राज्यातील १३ बसस्थानकांच्या यादीत संभाजीनगर बसस्थानकाचा नूतनीकरण आणि आधुनिकरणात समावेश होता. त्यानुसार एसटी प्रशासनाकडून काम पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न सुरू होते. भोगवटा प्रमाणपत्र मिळविण्यासाठी एप्रिल २०२४ पासून एसटीच्या विभागीय कार्यालयाकडून प्रयत्न सुरू होते. विभागीय अभियंता विभागाने त्यासाठी अनेक विभागांकडे प्रयत्न केले. अखेर एनओसी मिळाली आहे. त्यामुळे मे महिन्यात उद्घाटनाचा नारळ फोडून बसस्थानक सेवेत सज्ज करावे, अशी प्रवाशांतून मागणी होत आहे.
९ कोटी ८० लाखांचा खर्च
मध्यवर्ती बसस्थानकातील कामकाजाचा भार कमी करण्यासाठी संभाजीनगर बसस्थानकाची नव्याने उभारणी झाली. हे बसस्थानक आधुनिक बसपोर्ट केले जात आहे. त्यासाठी ९.८ कोटींच्या निधीपैकी ८ कोटी ७३ लाखांचा खर्च केला तर उर्वरित कामासांठी अन्य निधी खर्च झाला आहे. रंगरंगोटीचे कामही पूर्ण झाले आहे. अंतर्गत रस्ते, विजेची व्यवस्था पूर्ण झाली आहे.
संभाजीनगर बसस्थानक
मध्यवर्ती बसस्थानक आणि रंकाळा बसस्थानकाच्या जागेच्या तुलनेत संभाजीनगर बसस्थानकाचा परिसर १२ एकरांचा आहे. त्यात तीन एकरांत डेपो आहे. कोल्हापूर विभागाच्या ताफ्यात ७५० एस.टी. आहेत. रोज विविध मार्गावर तीन लाखांहून अधिक प्रवासी वाहतूक आहे. संभाजीनगर आगारातून, रंकाळा बसस्थानकातून वाहतुकीचे नियोजन केले जाते.
प्रवासी वाहतूक कुठे
संभाजीनगर आगारातून कोकणासह गारगोटी, राधानगरी, गगनबावडा या तीन मोठ्या तालुक्यांत प्रवासी वाहतुकीला सुटसुटीत होणार आहे तर निपाणी, बेळगांव, हुबळीसह कर्नाटकात मोठ्या प्रमाणात वाहतुकीला संधी आहे. कारण संभाजीनगरपासून पुणे-बंगळूर महामार्ग तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे.
दर्शनीभाग मॉलसाठी
नवीन बसपोर्टचा दर्शनी भाग व्यापारासाठी दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात बसस्थानकाचे काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात या भागाचे विस्तारीकरण होईल.
सुमारे वर्षभर एनओसीसाठी प्रयत्न सुरू होते. अखेर ती मिळाली आहे. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्याची माहिती वरिष्ठ कार्यालयाला पाठविली आहे. त्यांच्याकडून पुढील सूचना मिळाल्यानंतर उदघाटनाची प्रकिया पूर्ण होईल. - सुरेश मोहिते, विभागीय अभियंता, एस.टी.