४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 19:56 IST2025-08-01T19:55:02+5:302025-08-01T19:56:05+5:30
सहा जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे

४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
कोल्हापूर: कोल्हापुरात मुंबई हायकोर्टाचे सर्किट बेंच व्हावे या मागणीसाठी गेल्या ४० वर्षापासून सुरु असलेल्या लढ्याला अखेर आज यश आले. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांनी आज शुक्रवार (दि.१) याबाबतचे नोटिफिकेशन प्रसिद्ध केले. यानिर्णयानंतर वकिलांनी कोल्हापुरात एकच जल्लोष केला. सर्किट बेंच मंजूर झाल्याने सहा जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की, मुंबई उच्च न्यायालयानेकोल्हापूर येथे उच्च न्यायालयाच्या न्यायदानाची व्यवस्था (सर्किट बेंच) उपलब्ध करुन दिली आहे. याबाबतचे राजपत्र सुद्धा प्रकाशित करण्यात आले असून, 18 ऑगस्ट 2025 पासून ते कार्यान्वित होईल. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर,… pic.twitter.com/2FtTI9gL63
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 1, 2025
अनेकदा केवळ तारखांसाठी मुंबईला जावे लागत असल्याने पक्षकारांचे मोठे हाल होत होते. यात वेळ, पैसा जात असल्याने कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावे अशी मागणी होती. यासाठी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनसह विविध सामाजिक संघटनांनी आणि राजकीय नेत्यांनी वेळोवेळी आंदोलने, मोर्चे काढले होते.
वाचा- सरन्यायाधीश गवई यांची शाहू छत्रपतींनी घेतली होती चार दिवसापुर्वीच भेट
मुंबईला जाण्याचा फेरा वाचणार
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांची नियुक्ती झाल्यापासून खंडपीठ मंजुरीच्या प्रक्रियेला अधिक वेग आला होता. सर्किट बेंचमुळे कोल्हापूरच्या विकासाला गती येणार आहे. सहा जिल्ह्यांतील वकील आणि पक्षकारांचा ओघ वाढणार असल्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे. मुंबईला जाण्याचा फेरा वाचणार असल्याने पक्षकारांनाही याचा मोठा फायदा होणार आहे.