मुंबईचे विमान रद्द झाल्याने ८५ प्रवाशांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 18:00 IST2019-09-26T17:59:04+5:302019-09-26T18:00:42+5:30
खराब हवामान आणि तांत्रिक अडचणीमुळे मुंबईहून येणारे विमान रद्द झाल्याने बुधवारी ८५ प्रवाशांना फटका बसला. अचानक फेरी रद्द केल्याने काही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

मुंबईचे विमान रद्द झाल्याने ८५ प्रवाशांना फटका
कोल्हापूर : खराब हवामान आणि तांत्रिक अडचणीमुळे मुंबईहून येणारे विमान रद्द झाल्याने बुधवारी ८५ प्रवाशांना फटका बसला. अचानक फेरी रद्द केल्याने काही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.
ट्रूजेट कंपनीचे विमान अहमदाबादहून जळगावला येते. तेथून मुंबई आणि मुंबईमधून हे विमान कोल्हापूरला येते. मात्र, खराब हवामानामुळे अहमदाबाद आणि जळगावहून मुंबईला विमान उशिरा आले. त्यामुळे मुंबईहून विमान निघाल्यास ते सायंकाळी साडेपाचनंतर पोहोचणार होते.
इतक्या वेळाने विमान पोहोचल्यास कोल्हापुरातून अंधारातून उड्डाण करणे तांत्रिकदृष्ट्या अडचणीचे ठरणार होते. त्यामुळे कंपनीने कोल्हापूर फेरी रद्द केली. त्याचा फटका मुंबईहून येणाऱ्या ३८ आणि कोल्हापूरमधून जाणाऱ्या ४७ प्रवाशांना बसला. ज्या प्रवाशांना दुसऱ्या दिवशीच्या विमानाने जायचे होते, त्यांना त्या दृष्टीने तिकीट देण्यात आले. ज्यांना तिकिटाचे पैसे हवे होते, त्यांना ते देण्यात आले.
दरम्यान, मुंबई-कोल्हापूर विमानसेवा दि. १ सप्टेंबरपासून सुरू झाली. त्यानंतर नियमितपणे सेवा पुरविण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात बुधवारी मात्र, खराब हवामानामुळे विमान एक तास उशिरा कोल्हापुरात आले होते.
खराब हवामान आणि तांत्रिक अडचणीमुळे मुंबईहून कोल्हापूरला येणारे विमान रद्द करण्यात आले. ज्या प्रवाशांनी तिकिटाचे पैसे अथवा दुसऱ्या दिवसाचे तिकीट मागितले, त्यांना ते देण्यात आले.
- रणजितकुमार,
कोल्हापूरचे व्यवस्थापक, ट्रूजेट कंपनी